
जगभरात हिंदुस्थानचा डंका वाजत आहे. अनेक बड्या कंपन्यांचे नेतृत्व हिंदुस्थानी वंशाची लोकं करत आहेत. आता यात आणखी एका नावाचा समावेश झाला आहे. हिंदुस्थानी वंशाचे आणि मुळचे महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या डॉ. समीर शहा (Dr Samir Shah) यांची बीबीसीच्या प्रमुखपदी निवड झाली आहे.
समीर शहा यांचा जन्म जानेवारी 1952मध्ये महाराष्ट्रातील संभाजीनगर येथे झाला. 1960मध्ये ते आपल्या कुटुंबासोबत ब्रिटनला गेले. येथेच त्यांनी शिक्षण घेतले आणि नोकरी केली. ते गेल्या 40 वर्षांपासून इंग्लंडमधील माध्यमक्षेत्रात कार्यरत असून ते ज्युपिटर टीव्हीचे (Juniper TV) मालकही आहेत.
2019मध्ये राणी एलिजाबेथ यांनी उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा सन्मानही केला होता. कजर्वेटिव्ह पक्षाशी संबंध असणारे शहा हे यूके सरकारचे पहिल्या क्रमांकाचे उमेदवार होते.
2020मध्ये बोरिस जॉन्सन यांच्या कार्यकाळात स्थापन करण्यात आलेल्या रेस अंड एथिनिक डिस्पॅरिटीज आयोगाचेही समीर शहा सदस्य होते. त्यावेळी ब्रिटनमध्ये ‘ब्लॅक लाईव्ह मॅटर्स’ हे आंदोलन सुरू होते. याच पार्श्वभूमीवर मार्च 2021मध्ये आयोगाने एक अहवाल सादर केला आणि त्यानंतर वाद आणखी वाढला. ब्रिटनमध्ये वर्णद्वेष सुरू असल्याचा अहवाल या आयोगाने दिला होता.

























































