‘हे’ आहे हिंदुस्थानातील बाऊन्सरांचे गाव, प्रत्येक घरात आहे एक पैलवान…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोठमोठी हॉटेल्स, डान्स बार्स, नाईट क्लब, पब्ज, मॉल्स आणि आता हॉस्पिटल्सबरोबरच मोठ्या इव्हेंट्स तसेच सेलिब्रिटीजच्या स्टाफमध्ये हाताच्या मसल्सचे प्रदर्शन किंवा भिती घालणारे, काळी कपडे परिधान केलेले, तगडे बॉडीबिल्डर बाउन्सर्स नेहमीच लक्षवेधी ठरतात.

हे बाउन्सर्स अनेकवेळा लोकांसाठी त्रास आणि वादविवादाचे विषय बनत असले, तरी बेकाबू गर्दीवर नियंत्रण आणि गोंधळ घालणार्‍यांना आपल्या ताकदीचा वापरु करुन उचलून बाहेर फेकण्यासाठी बाउन्सर्सचा रोल खूप महत्वाचा असतो. प्रामुख्याने महानगरांमध्ये अशा महाकाय बाउन्सर्सना खूप मागणी वाढत आहे.

दिल्ली आणि आसपासच्या हरियाणातील गुरुग्राम आणि उत्तर प्रदेशातील नोएडा परिसराचा कायापालट जितक्या झपाट्याने होत आहे, तितक्याच प्रमाणात मसल पॉवरवाल्या बाउन्सर्स आणि पैलवानांची गरज भासत आहे. विशेष म्हणजे बाउन्सर्सच्या या प्रोडक्टची बहुतेक मागणी दक्षिण दिल्लीलगतची असोला आणि फत्तेपुरी बेरी ही जुळी गावे पुरवतात.

दिल्ली महानगर, नोएडा आणि गुरुग्राममधील विविध प्रकारच्या अस्थापनांमध्ये काम करणारे तब्बल 90 टक्के बाउन्सर्स असोला किंवा फत्तेपुरी बेरीचेच रहिवासी आहेत. या दोन्ही गावांमधील सुमारे 10 हजार तरुण बाउन्सर्सच्या प्रोफेशनमध्ये कार्यरत दिसतात. त्यामुळे गावांमधील घरोघरी ट्रेडमिल, वेटलिफ्टींग आणि व्यायामाचे साहित्य हे फर्निचरप्रमाणेच आवश्यक बनले आहे.

येथील लहान लहान मुले बाउन्सर बनण्याचेच स्वप्न घेउन बॉडी शॉडी तयार करण्याच्या मागे लागलेली दिसतात. मग या गावांना हिंदुस्थानातील सर्वात मजबूत म्हणून ओळखले जाण्यात काय आश्चर्य? येथे दहा बारा वर्षांच्या लहान मुलांपासून अगदी 50 पर्यंतच्या वयोगटातील लोकही नियमिपणे जिम, कुस्ती आखाड्यात घाम गाळताना दिसतात. त्यांच्यासाठी शेती इतकेच मसल्सही पैसे मिळवून देणारे साधन बनले आहे.

येथील बाउन्सर्सच्या परंपरेची सुरुवात झाली ती सुमारे पंधरा वर्षांपुर्वी. विजय तंवर नावाच्या येथील स्थानिक पैलवानाला ऑलिम्पिकमध्ये पात्रता मिळवण्यात अपयश आले. त्यावेळी त्याच्याकडे सरकारी नोकरी नसल्यामुळे पैलवानीच्या खुराकाचा प्रश्न निर्माण झाला होता.

मग त्याला दक्षिण दिल्लीतील एका नाईट क्लबमध्ये बाउन्सरचा जॉब ऑफर करण्यात आला. अशा प्रकारे विजय या परिसरातील पहिला प्रोफेशनल बाउन्सर बनला. या नोकरीमधून विजयला मिळणारे पैसे आणि चकाचक लाईफस्टाईल पाहून प्रभावीत झालेले अनेक पैलवान बाउन्सर बनू लागले.

हळूहळू बाउन्सर हाच येथील तरुणांसाठी ड्रिम जॉब बनत गेला. त्यांना बाउन्सर म्हणून सरासरी मासिक 30 ते 50 हजार रुपये इतके वेतन मिळते. ज्याचा उपयोग ते कुटुंब चालवण्यासाठी किंवा पैलवान म्हणून ऑलिम्पिकमध्ये उतरण्यासाठीही करू शकतात.

बाउन्सर म्हणून या पैलवानांना कुस्तीपेक्षा चांगले पैसे मिळत असले तरी या पेशामधून त्यांचा गुन्हेगारी जगताशीही संबंध येण्याची शक्यता असल्यामुळे ते भरकटत जाऊ नये, ही एकमेव चिंता त्यांच्या कुटुंबियांना सतावत असते. कोरा (quora) या प्रश्न उत्तरांच्या एका संकेतस्थळावर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना दीपक पाटील यांनी ही माहिती दिली.