हिंदुस्थानविरोधात चीन मोठ्या युद्धाच्या तयारीत, पेंटागॉनचा अहवाल

अमेरिकेच्या संरक्षण विभागाने म्हणजेच पेंटागॉनने हिंदुस्थानची चिंता वाढवणारा अहवाल प्रसिद्ध केला आहे. चीनच्या प्रत्यक्ष ताबारेषेवर कुरापती सुरूच असून त्या वाढत जाणार असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. चीनने प्रत्यक्ष ताबा रेषा परिसरापर्यंत ऑप्टीक फायबर नेटवर्क उभं करण्याचं काम सुरू केलं आहे. या भागापर्यंत संवाद आणि संचार अखंडीत सुरू राहावा आणि तो वेगाने करता यावा हा त्यामागचा उद्देश आहे. चीन अण्वस्त्रांचीही वेगाने निर्मिती करत असून 2030 सालापर्यंत त्यांच्याकडे जवळपास 1 हजार अण्वस्त्रे असतील अशी भीतीही पेंटॉगॉनने वर्तवली आहे.

पेंटॉगॉनने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलंय की 2020 साली हिंदुस्थान आणि चीनमध्ये जो तणाव निर्माण झाला होता त्यानंतर हिमालयाच्या पश्चिमेकडच्या भागात चीनने वेगाने ऑप्टीक फायबरचं जाळं निर्माण करायला सुरुवात केली. इतर देशांना आपला संवाद कळू नये यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले आहे. ऑप्टीक फायबरमुळे सीमेवर सुरू असलेल्या गुप्त हालचालींवर लक्ष ठेवणं, सैनिकी कारवाया वेगाने करणे हे शक्य होणार आहे. पेंटॉगॉनने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलंय की कोरोनाचं संकट असतानाही चीनने हिंदुस्थानसोबत असलेला तणाव कायम ठेवला आणि सीमेवरील सैनिकांच्या हालचाली देखील त्यांनी वाढवल्या होत्या. गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर हिंदुस्थान आणि चीन यांच्यातील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांच्या राजदूतांची बैठकही झाली होती. चीनने या बैठकीत माघारीची भाषा वापरली मात्र त्यावर अंमल केला नाही. चीनने सीमेवर सैनिकी हालचाली वाढवतच नेल्या आहेत

पेंटॉगॉनने त्यांच्या अहवालात म्हटलंय की चीन अण्वस्त्रेही मोठ्या प्रमाणात तयार करत असून पुढील 6 वर्षांत त्यांच्याकडे 700 अण्वस्त्र असतील. 2030 पर्यंत हा आकडा 1 हजारपर्यंत पोहचू शकतो असंही अहवालात म्हटलं आहे. पेंटॉगॉनने गेल्या वर्षी प्रसिद्ध केलेल्या अहवालत म्हटलं होतं की चीनकडे 200 अण्वस्त्रे आहेत. त्यात या वर्षी कितीची भर पडली आहे, हे मात्र कळू शकलेलं नाही.