कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी हिंदुस्थानच्या उपाययोजनांचे डब्लू.एच.ओ.कडून कौतुक

11984
प्रातिनिधिक फोटो

कोरोनाच्या जागतिक संकटाशी जगभरातून मुकाबला सुरू आहे. या संकटाच्या धोक्याचा अंदाज, अमेरिका, इटली आणि युरोपीय देशांना आला नाही. त्यामुळे कोरोनाचा या देशांमध्ये वेगाने फैलाव झाला आहे. इटली, अमेरिका आणि इराणमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. या देशांमध्ये कोरोनाने दररोज हजारोंच्या संख्यने बळी जात आहेत. जगभरात अशी परिस्थिती असताना हिंदुस्थानने संभाव्य धोका ओळखून तातडीच्या उपाययजोना केल्यामुळे हिंदुस्थानात कोरोनाचा फैलाव नियंत्रणात असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. हिंदुस्थानकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचेही डब्लू.एच.ओ.ने कौतुक केले आहे.

हिंदुस्थानात कोरोना रुग्णांची संख्या 500 पर्यंत पोहचली आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशभरातल्या चार राज्यात कर्फ्यू लागू करण्यात आला असून सहा राज्यातील 548 जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन घोषित केले आहे. चीनचा शेजारी देश असल्याने हिंदुस्थानला कोरोनाचा मोठा धोका होता. मात्र, हिंदुस्थानने सुरुवातीपासूनच सर्तकता दाखवली आहे. जानेवारी महिन्यापासूनच देशातील विमानतळांवर प्रवाशांची थर्मल तपासणी करण्यात येत होती. तसेच देशात कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर विलगीकरण, तपासण्या, गर्दी कमी करणे, त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे हिंदुस्थाने योग्य प्रकारे केले आहे, असे डब्लू.एच. ओ. चे कार्यकारी संचालक मायकल रेयान यांनी म्हटले आहे. हिंदुस्थानसारख्या मोठ्या देशात कठोर निर्णय घेणे आणि त्याची अंमलबजावणी करणे कठीण असते. मात्र, प्रत्येक निर्णय योग्य टप्प्यावर घेत हिंदुस्थानने कोरोनाला मोठा अटकाव केला आहे, अशा शब्दांत डब्लू.एच.ओ.ने हिंदुस्थानचे कौतुक केले आहे. त्यामुळे हिंदुस्थान कोरोनावर मात करण्यात यश मिळवेल अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या