
जागतिक क्रमवारीत नवव्या क्रमांकावर असलेल्या हिंदुस्थानी महिला हॉकी संघाने विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात चौथ्या क्रमांकावरील बलाढ्य चीनला 2-2 असे बरोबरीत रोखत जोरदार सलामी दिली. आशिया कपच्या अंतिम सामन्यात हिंदुस्थानला पराभूत करणाऱ्या चीनविरुद्ध यावेळी हिंदुस्थानी महिलांनी कडवी झुंज देत सामना हातातून निसटू दिला नाही.
वॅगनर स्टेडियमवर झालेल्या सामन्यात आठव्या मिनिटाला नवनीत कौरने मैदानी गोल करत हिंदुस्थानला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. मात्र 15व्या मिनिटाला चीनला पेनल्टी स्ट्रोक मिळाला. झांग यिंगने त्याचे गोलमध्ये रूपांतर करत सामना 1-1 असा बरोबरीत आणला. यानंतर हिंदुस्थानने पुन्हा आक्रमणाची धार वाढवली. 25व्या मिनिटाला दीपिकाने पेनल्टी कॉर्नरवर अचूक गोल करत हिंदुस्थानला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. मात्र 39व्या मिनिटाला मा निंगने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत चीनला पुन्हा बरोबरी साधून दिली.
अखेरच्या क्षणी चीनचा दबाव; हिंदुस्थानचा भक्कम बचाव
सामन्याच्या शेवटच्या चार मिनिटांत चीनला सलग दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले. मात्र हिंदुस्थानी बचावफळीने दोन्ही संधी हाणून पाडल्या. चीनचा पहिला ड्रगफ्लिक ब्लॉक करण्यात आला. त्यानंतर मिळालेल्या दुसऱ्या पेनल्टी कॉर्नरवर फान युनशियाचा फटका लक्ष्यापासून दूर गेला. त्यामुळे हिंदुस्थानने सुटकेचा निःश्वास सोडत महत्त्वाचा गुण खिशात टाकला.
आशिया चषकातील पराभवाचा वचपा
2025च्या आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात चीनने हिंदुस्थानचा 4-1 असा पराभव केला होता. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक पटकावणाऱ्या चीनविरुद्ध विश्वचषकातील हा सामना हिंदुस्थानसाठी मोठी कसोटी मानला जात होता. मात्र हिंदुस्थानी संघाने त्या पराभवाची आठवण बाजूला सारत चीनला चांगलेच रोखले.
सवितावर मोठी जबाबदारी
अनुभवी गोलरक्षक सविता पुनियासाठी हा तिसरा विश्वचषक आहे. तब्बल 313 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या सविताने दोन ऑलिम्पिक आणि तीन आशियाई क्रीडा स्पर्धांमध्येही हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केले आहे. दबावाच्या क्षणी संघाची किल्लेबंदी सांभाळण्याची मोठी जबाबदारी तिच्यावर आहे.
दरम्यान, ड्रगफ्लिकर दीपिका आणि नवनीत काwर यांचा फॉर्म हिंदुस्थानसाठी आशादायक ठरला आहे. दीपिकाने 2026च्या नेशन्स कपमध्ये सहा गोल केले होते. त्या स्पर्धेत हिंदुस्थानने विजेतेपद पटकावले होते. नवनीतनेही आशिया कप आणि विश्वचषक पात्रता स्पर्धेत गोल करत आपली छाप पाडली आहे.

























































