
देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. गेल्या तीन दिवसात दररोज एक हजाराहून अधिक कोरोनाग्रस्तांचा मृत्यू होत आहे तर दिवसाला दोन लाखाहून अधिक कोरोनाग्रस्त आढळून येत आहे. देशातील ही परिस्थिती चिंताजनक असली तरी या पुढे येणारी परिस्थिती ही अधिकच चिंता वाढवणाऱी असल्याचे समोर आले आहे. जून महिन्यात देशातर दररोज तब्बल अडीज हजाराच्या आसपास लोकांचा मृत्यू होऊ शकतो, असे समोर आले आहे.
इंडिया टास्क फोर्सच्या लँन्सेटच्या अहवालात ही धक्कादायक माहिती दिली आहे. या फोर्सने ‘हिंदुस्थानातील दुसऱ्या लाटेचे व्यवस्थापन व उपाय’ हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. यात देशातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत सांगितले आहे. ”देशात कोरोनाची लाट विक्राळ स्वरुप धारण करू लागली आहे. दररोज बाधितांचा आकडा वाढत चालला आहे. मे महिन्यात हिंदुस्थानात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दररोज 1750 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू होऊ शकतो तर हा आकडा जून मध्ये 2320 जणांचा दररोज मृत्यू होऊ शकतो”, असा अंदाज या अहवालातून व्यक्त करण्यात आला आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत रुग्णवाढीचा वेग खूप जास्त आहे. फेब्रुवारी ते एप्रिल या महिन्यांतील अवघ्या चाळीस दिवसात कोरोनाग्रस्तांचा आकडा 10 हजारावरून तब्बल 80 हजारांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी हा आकडा गाठायला 83 दिवस लागले होते.



























































