देशात 75 लाख रुग्ण कोरोनामुक्त , ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 6.83 टक्क्यांवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशभरात तब्बल 75 लाखांहून अधिक नागरिकांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत देशातील कोरोनाबधितांची संख्या 82 लाख 29 हजार एवढी आहे. त्यापैकी 75 लाखाहून अधिक रुग्ण कोरोना मुक्त झाले असून आता केवळ 5 लाख 61 हजार कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. देशातील एकूण कोरोनाबाधितांच्या तुलनेत केवळ 6.83 टक्के ॲक्टिव्ह केसेस असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

देशात गेल्या 24 तासांत 45 हजार 230 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 53 हजार 285 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील दोन महिन्यांचा विचार करता ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या तिपटीने कमी झाली आहे. यावरून कोरोनाबाधितांची संख्या झपाटय़ाने कमी होत असल्याचे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने म्हटले आहे.

देशाचा रिकव्हरी रेट 91.68 टक्क्यांवर

देशाचा रिकव्हरी रेट आता 91.68 टक्क्यांवर गेला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनामुक्त होणाऱयांची संख्या केरळ आणि कर्नाटकात मोठी असून ती प्रत्येकी आठ हजारांहून अधिक आहे. तसेच 24 तासातील एकूण मृतांपैकी 82 टक्के मृत 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील आहेत.