पाकिस्तानचा पुन्हा कश्मीर राग; आता POK सोडा, हिंदुस्थानने खडसावले

संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत हिंदुस्थानने पाकिस्तानला पुन्हा एकदा फटकारत पाकव्याप्त कश्मीर (POK)सोडा, असे खडसावले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सभेत पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी भाषणात पुन्हा कश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर राईट टू रिप्लायमध्ये हिंदुस्थानचे इंडिया मिशनचे प्रधान सचिव मिजितो विनितो यांनी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तानने कश्मीर मुद्दा उपस्थित केला आहे. मात्र, आता कश्मीर मुद्द्यावर पाकव्याप्त कश्मीरशिवाय कोणत्याच विषयावर चर्चेची गरज नाही. पाकिस्तानने अवैधपणे कब्जा केलेला पाकव्याप्त कश्मीर त्यांना सोडावाच लागेल, असेही त्यांनी खडसावले.

एका व्यक्तीचे भाषण आपण ऐकले. त्यांच्याकडे या सभेत बोलण्यासाठी कोणताही मुद्दा नाही. जगाला फायदा होईल,अशी कोणतीही सूचना ते करू शकत नाही. त्यामुळे कश्मीरसारखा मुद्दा उपस्थित करत आहेत. कश्मीर मुद्द्यावर आता फक्त पाकव्याप्त कश्मीरवरच चर्चा होऊ शकते आणि त्यांना पाकव्याप्त कश्मीर सोडावाच लागेल, असे विनितो यांनी सुनावले. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी पाकिस्तानी संसदेत ओसामा बिन लादेन याचा उल्लेख शहीद असा केला होता. तसेच पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचे अनेकदा स्पष्ट झाल्याचेही त्यांनी सांगितले.

इमरान खान यांनी 2019 मध्ये पाकिस्तानात 30 ते 40 हजार दहशतवादी असल्याची कबुली दिली होती, त्याची आठवणही विनितो यांनी करून दिली. दहशतवाद्यांना प्रशिक्षण देऊन हिंदुस्थानातील जम्मू कश्मीर आणि अफगाणिस्तानात दहशतवाद पसरवण्यासाठी पाठवण्यात आल्याचेही इमरान खान म्हणाले होते. तसेच पाकिस्तानात अल्पसंख्य असलेल्या हिंदू, शीख, ख्रिश्चनांसह इतर धर्मियांवर अत्याचार होत असून त्याचे जबरदस्तीने धर्मपरिवर्तन करण्यात येत असल्याचे विनितो यांनी सांगितले. संयुक्त राष्ट्रांच्या सभेत पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी कश्मीरचा मुद्दा उपस्थित करताच हिंदुस्थानचे प्रतिनिधी सभेतून बाहेर पडले.

आपली प्रतिक्रिया द्या