
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
हिंदुस्थानी हवाई दलाचे सामर्थ्य आणखी वाढवण्यासाठी हिंदुस्थानने रशियात बनवलेल्या 21 मिग-29 विमाने खरेदी करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. हिंदुस्थानी हवाई दलाला 42 स्क्वॉर्डनची गरज आहे. सध्या हिंदुस्थानकडे 30 स्क्वॉर्डन आहेत. एका स्क्वॉर्डनमध्ये 16 ते 18 लढाऊ विमाने असतात. रशियाकडून 21 मिग-29 खरेदी केल्यास हवाई दलाचे सामर्थ्य आणखी वाढणार आहे. त्याचबरोबर सप्टेंबर 2019 मध्ये हिंदुस्थानात पहिले राफेल विमानही दाखल होणार आहे.
हवाई दलात मिग-29 विमानांचे तीन स्क्वॉर्डन आहेत. हे सर्व पश्चिम सीमेवर तैनात करण्यात आले आहेत. हिंदुस्थानकडे मिग 29 विमानांचा नाविक ताफाही आहे. तो आयएनएस विक्रमादित्यवर तैनात करण्यात आले आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये हवाई दलाचे एक पथक मिग 29 ची चाचणी घेण्यासाठी रशियात गेले होते. त्यानंतर हवाई दलाचे सामर्थ्य वाढवण्यासाठी हिंदुस्थान रशियाकडून 21 मिग 29 खरेदी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
हवाई दलात असलेले मिग-29 अत्याधुनिक रडार यंत्रणेने सक्षम करण्यात आले आहे. हवेतून हवेत मारा करण्याच्या क्षमतेमुळे ते लढाऊ विमानांच्या 4.5 श्रेणीत दाखल झाले आहेत. एका लढाऊ विमानाची किंमत 285 ते 300 कोटींपर्यंत असण्याची माहिती सूत्रांनी दिली. हे विमान सलग पाच तास उड्डाण करू शकते. हवाई दलाच्या ताफ्यात असणाऱ्या इतर विमानांना अद्ययावत करण्याची प्रक्रियाही सुरू आहे. त्यामुळे हवाई दलाला लढाऊ विमानांची कमतरता भासणार नाही. तसेच चीन आणि पाकिस्तानला वचक बसेल असे सामर्थ्य हवाई दलाकडे येणार आहे.
























































