हिंदुस्थानींना मिळणार ई-पासपोर्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

देशात पेपर पासपोर्ट हा प्रकार लवकरच इतिहास जमा होऊन त्याची जागा चिपवर आधारित ई-पासपोर्ट घेणार आहे. केंद्र सरकार एका मध्यवर्ती पासपोर्ट प्रणालीवर काम करत असून या प्रणालीअंतर्गत जगभरातील दूतावास आणि हिंदुस्थानी राजदूतावासामार्फत लोकांना ई-पासपोर्ट वितरित केले जातील अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

उत्तर प्रदेश सरकारने परराष्ट्र मंत्रालयाच्या सहकार्याने प्रवासी भारतीय दिनाचे आयोजन वाराणसी येथे केले होते. यावेळी सुमारे पाच हजार प्रतिनिधींनी या कार्यक्रमात भाग घेतला होता. या कार्यक्रमात मोदी बोलत होते.

जगभरातील हिंदुस्थानी राजदूतावास आणि दूतावासांना पासपोर्ट सेवा प्रकल्पाशी जोडले जाणार आहेत. याशिवाय केंद्र सरकार पर्सन ऑफ इंडियन ओरिजीन (पीआयओ) आणि ओव्हरीज सिटीझन ऑफ इंडिया (ओसीआय) कार्डासाठी व्हिसा जारी करण्याच्या प्रक्रिया सोपी करण्याबाबत उपाययोजना करीत असल्याचे मोदी यांनी सांगितले.

जगात जेथे जेथे हिंदुस्थानी राहत असतील तेथे तेथे त्यांनी आनंदी आणि सुरक्षित राहावे हाच आमच्या सरकारचा प्रयत्न असल्याचे मोदी यांनी सांगितले. परदेशात सुमारे दोन लाखांहून अधिक हिंदुस्थानींना विविध समस्यांना सामोरे जावे लागले आहे. गेल्या साडेचार वर्षांपासून आमचे सरकार त्यांची मदतही करत असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.