
हिंदुस्थान-ऑस्ट्रेलियादरम्यान सुरू असलेल्या बॉर्डर-गावसकर चषक स्पर्धेतील दुसरा कसोटी क्रिकेट सामना शुक्रवारपासून राजधानी नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर सुरू होणार आहे. या मैदानावर तब्बल 36 वर्षांपासून हिंदुस्थानी संघ कसोटी क्रिकेटमध्ये अजेय आहे. 1987 साली या मैदानावर हिंदुस्थानी संघाने कसोटीत अखेरचा पराभव पत्करलेला आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या बालेकिल्ल्यात पाहुण्या ऑस्ट्रेलियन संघाची खरी ‘कसोटी’ लागणार आहे.
चेतेश्वर पुजाराचे अनोखे शतक
हिंदुस्थानच्या कसोटी संघाच्या फलंदाजीचा कणा असलेला चेतेश्वर पुजारा दिल्लीमध्ये कारकीर्दीतील शंभरावी कसोटी खेळणार आहे. हिंदुस्थानकडून शंभरावी कसोटी खेळणारा तो 13 वा क्रिकेटपटू ठरणार आहे. दुसऱ्या कसोटीच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत बोलताना पुजारा म्हणाला. ‘कारकीर्दीतील शंभरावी कसोटी माझ्यासाठी खास असेल. हे अनोखे शतक मी वडिलांना समर्पित करणार आहे. कारकीर्दीतील शंभरावा कसोटी सामना पाहण्यासाठी माझे कुटुंबीय स्टेडियमवर हजर राहणार आहे,’ असेही पुजाराने सांगितले.
कांगारू विजयाचा दुष्काळ संपविणार का?
ऑस्ट्रेलियाने 90 च्या दशकात क्रिकेटविश्वावर अधिराज्य गाजविले, मात्र मागील 64 वर्षांपासून दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर कांगारूंना विजय मिळविता आलेला नाहीये. या मैदानावरील 1959 पासूनचा विजयाचा दुष्काळ पाहुणा संघ संपविणार का? याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष असेल. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघाने या मैदानावर हिंदुस्थानला हरविले, तर पाहुण्या संघासाठी हा ऐतिहासिक विजय ठरणार आहे.
डब्ल्यूटीसी फायनल अन् ‘नंबर वन’चे सिंहासन
ऑस्ट्रेलियाविरुद्धची दुसरी कसोटी जिंकल्यास टीम इंडियाने जवळपास जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल गाठलेली असेल. याचबरोबर कसोटी क्रमवारीतील ‘नंबर वन’चे सिंहासन काबीज करण्यासाठीदेखील हिंदुस्थानला ही कसोटी मालिका जिंकावी लागणार आहे. त्यामुळे हिंदुस्थानसाठी मायदेशातील ही मालिका अतिशय महत्त्वाची आहे.
खेळपट्टी फिरकीसाठी अनुकूल
जेटली स्टेडियमच्या खेळपट्टीवर पाणी मारून रोलिंग करण्यात आले आहे. खेळपट्टीवर गवतही नाहीये. याचाच अर्थ खेळपट्टीमध्ये नरमपणा असेल. अशी खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल असते. हिंदुस्थानची फिरकी गोलंदाजी पाहुण्या संघापेक्षा सरस असल्याने या घडीला तरी यजमान संघाचे पारडे जड वाटत आहे.
मिचेल स्टार्क खेळण्याचे संकेत
वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क दिल्ली कसोटीत पुनरागमन करू शकतो, असे संकेत पॅट कमिन्सने दिले आहेत. स्टार्क फिट आहे, मात्र एक फिरकी गोलंदाज वाढवायचा की वेगवान गोलंदाजाला संधी द्यायची हे अद्याप ठरलेले नाही. कॅमरून ग्रीनने गुरुवारी कसून सराव केलाय. त्यालाही संधी मिळण्याचे संकेत कमिन्सने दिले आहेत.
टीम इंडियाला दिल्लीत मिळाले नाही हॉटेल
दुसऱ्या कसोटीसाठी दिल्लीत दाखल झालेल्या हिंदुस्थानी संघाला हॉटेलच मिळाले नाही. सध्या दिल्लीत जी-20 समिट आणि लगीनसराई सुरू असल्यामुळे येथील बहुतांश फाईव्ह स्टार हॉटेल्स आधीच बुक झालेली आहेत. त्यामुळे ‘बीसीसीआय’ला यावेळी टीम इंडियासाठी दिल्लीऐवजी नोएडामध्ये हॉटेल बुक करावे लागले. एरव्ही हिंदुस्थानी संघ दिल्लीतील ताज हॉटेल किंवा आयटीसी हॉटेलमध्ये थांबत असतो, मात्र यावेळी हा संघ नोएडातील लीला हॉटेलवर थांबला आहे.

























































