पाचवी कसोटी रंगतदार वळणावर; इंग्लंडला विजयासाठी हव्यात 119 धावा, रूट-बेअरस्टॉची दीडशतकी भागीदारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कसोटी मालिकेत 2-1ने आघाडीवर असलेल्या टीम इंडियाने बर्मिंगहॅमच्या पाचव्या व अखेरच्या कसोटी क्रिकेट सामन्यावर तीन दिवस वर्चस्व गाजवले. हिंदुस्थानने दुसऱया डावात 245 धावा करीत पहिल्या डावातील 132 धावांच्या आघाडीच्या जोरावर इंग्लंडला विजयासाठी 378 धावांचे लक्ष्य दिले. मात्र इंग्लंडचा अर्धशतकवीर अलेक्स लीस (56), सलामीवीर झक क्राउली (46) यांच्या झुंझार खेळी आणि ओली पॉप शून्यावर परतल्यावर जो रूट (नाबाद 76) व जॉनी बेअरस्टो (नाबाद 72) जोडीने चौथ्या विकेटसाठी 150 धावांची भागीदारी साकारत यजमानांना विजयाच्या द्वारावर आणून ठेवले आहे. आता अखेरच्या पाचव्या दिवशी हिंदुस्थानी गोलंदाज इंग्लंडचा डाव लवकर संपुष्ठात आणतात की उर्वरित इंग्लिश फलंदाज उरलेल्या 119 धावा करतात यावर लढतीचा निकाल अवलंबून आहे.

हिंदुस्थानने तिसऱया दिवसाच्या 3 बाद 125 धावसंख्येवरून सोमवारी दुसऱया डावात पुढे खेळायला सुरुवात केली. मात्र हिंदुस्थानचा डाव 81.5 षटकांत 245 धावांत संपुष्टात आला. चेतेश्वर पुजारा (66) व रिषभ पंत (57) ही तिसऱया दिवसाची नाबाद जोडी चौथ्या दिवशी अपयशी ठरली. पुजाराने 168 चेंडूंत 66 धावा करताना 8 चेंडू सीमापार पाठविले, तर पंतने 86 चेंडूंत 8 चौकारांसह 57 धावांची खेळी केली. इंग्लंडने सोमवारी आठव्या षटकात ही जोडी फोडली. स्टुअर्ट ब्रॉडने पुजाराला लीसकरवी झेलबाद केले.

त्यानंतर श्रेयस अय्यरही 19 धावांवर बाद झाला. त्याला मॅथ्यू पॉट्सने ऍण्डरसनकडे झेल देण्यास भाग पाडले. रवींद्र जाडेजाने (23) तळाच्या फलंदाजांना हाताशी धरून हिंदुस्थानला 245 धावसंख्येपर्यंत पोहोचविले. शार्दुल ठाकूर (4), मोहम्मद सिराज (13), जसप्रीत बुमराह (7) यांच्याकडून जाडेजाला फारशी साथ मिळाली नाही. शेवटी बेन स्टोक्सला मैदानाबाहेर भिरकावण्याच्या नादात जाडेजाचा त्रिफळा उडाला अन् हिंदुस्थानचा डाव संपला. मोहम्मद सिराज 2 धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सने 4, तर स्टुअर्ट ब्रॉड व मॅथ्यू पॉट्स यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. जेम्स ऍण्डरसन व जॅक लिच यांनी 1-1 फलंदाज बाद केला.

संक्षिप्त धावफलक

हिंदुस्थान पहिला डाव – 416 धावा.
इंग्लंड पहिला डाव – 245 धावा.

हिंदुस्थान दुसरा डाव – शुभमन गिल झे. ब्राउली गो. ऍडरसन 4, चेतेश्वर पुजारा झे. लीस गो. ब्रॉड 66, हनुमा विहारी झे. बेअरस्टॉ गो. ब्रॉड 11, विराट कोहली झे. रुट गो. स्टोक्स 20, रिषभ पंत झे. रुट गो. लिच 57, श्रेयस अय्यर झे. ऍण्डरसन गो. पॉट्स 19, रवींद्र जाडेजा त्रि.गो. स्टोक्स 23, शार्दुल ठाकूर झे. ब्राउली गो. पॉट्स 4, मोहम्मद शमी झे. लीस गो. स्टोक्स 13, जसप्रीत बुमराह झे. ब्राउली गो. स्टोक्स 7, मोहम्मद सिराज नाबाद 2. एकूण ः 81.5 षटकांत 245 धावा.
गोलंदाजी – जेम्स ऍण्डरसन 19-5-46-1, स्टुअर्ट ब्रॉड 16-1-58-2, मॅथ्यू पॉट्स 17-3-502, जॅक लीच 12-1-28-1, बेन स्टोक्स 11.5-0-33-4.

इंग्लंड, दुसरा डाव – 57 षटकांत 3 बाद 259. अलेक्स लीस 56, झक क्राऊली 46, ओली पॉप 0, जो रूट खेळत आहे 76, जॉनी बेअरस्टो खेळत आहे 72; जसप्रीत बुमराह 13-0-53-2, मोहम्मद शमी 12-2-49-0, रवींद्र जाडेजा 15-2-53-0.