
सामना ऑनलाईन । श्रीनगर
नव वर्षाच्या पूर्वसंध्येला जम्मू-कश्मीरात प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर घुसखोरी करणाऱया बॉर्डर ऍक्शन टीमचा (बॅट) कट उधळण्यात आला. हिंदुस्थानी जवानांनी जोरदार प्रत्युत्तर देताना दोन पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा केला.
प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर नौगाम सेक्टरमध्ये पाकडय़ांकडून रविवारी पहाटे घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला. दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी पाकिस्तानी सैन्याचे ‘बॅट’ पथक मदत करीत होते. घनदाट जंगलात ही घुसखोरी होत होती. पाकिस्तानी सैनिकांकडून रॉकेट लाँचर्स आणि मॉर्टर्सने हल्ले केले गेले. सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. बीएसएफने दिलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचे दोन सैनिक ठार झाले अशी माहिती लष्कराच्या प्रवक्त्याने दिली. खात्मा केलेल्या दोघा पाकिस्तानींकडून मोठा शस्त्रासाठा आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. दरम्यान नववर्षाच्या पूर्वसंध्येला हिंदुस्थानी लष्कराच्या चौक्यांवर मोठय़ा प्रमाणावर हल्ले करण्याचा पाकडय़ांचा कट होता हे उघड झाले आहे. सीमेवर हायअॅलर्ट जारी केला असून नौगाम सेक्टरमध्ये सर्च ऑपरेशन सुरू आहे.
























































