…तो शेवटचा श्वास घेत होता आणि प्रेक्षक टाळ्या वाजवत होते

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। दुबई

हिंदुस्थानी वंशाचे स्टँडअप कॉमेडियन मंजूनाथ नायडू (36) यांचा शुक्रवारी दुबई य़ेथे स्टेजवर लाईव्ह परफॉर्म करताना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मृत्यू झाला. परफॉर्म करत असताना मंजूनाथ खूपच उत्साहीत झाले होते. प्रेक्षकही खळाळून हसत त्यांना दाद देत होते. त्याचवेळी अचानक ते खाली कोसळले. हा देखील त्यांच्या परफॉर्मनसचा भाग असावा असे वाटल्याने प्रेक्षक टाळ्या वाजवत होते. पण बराचवेळ झाला तरी मंजूनाथ उठलेच नाहीत.

खलीज टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार मंजुनाथ यांचा शुक्रवारी येथील ‘अल बरशा’ हॉटेलमध्ये कॉमेडी शो होता. स्टँडअप कॉमेडियन म्हणून प्रसिद्ध असलेल्या मंजुनाथ यांचा शो पाहण्यासाठी प्रेक्षकांची तुफान गर्दी होती. शो हाऊस फुल होता. ठरेलल्या वेळी शो सुरू झाला. दोन तासांचा हा शो संपण्यासाठी शेवटचे काहीच मिनिटं बाकी होते. मंजुनाथ यांच्या वडील व कुटुंबाच्या विनोदावर प्रेक्षकही हसून दाद होते. सगळे व्यवस्थित सुरू होते. त्याचवेळी अचानक हसता हसता मंजुनाथ बाजूच्या एका खुर्चीवर बसले आणि खाली पडले. तो देखील परफॉर्मन्सचा भाग असावा असे वाटल्याने प्रेक्षक टाळ्या वाजवत होते. पण बराचवेळ झाला तरी मंजुनाथ उठलेच नाहीत. यामुळे आयोजक व पडद्यामागचे सहकारी स्टेजवर धावले. तेव्हा मंजुनाथ निपचित पडल्याचे त्यांना आढळले. त्यानंतर डॉक्टरांना तातडीने बोलवण्यात आले. पण तोपर्यंत उशीर झाला होता. मंजुनाथ यांनी शेवटचा श्वास घेतला आणि उपचार सुरू होण्याआधीच त्यांचे निधन झाले. मंजुनाथ यांच्या या अकस्मिक निधनाने त्यांच्या कुटुंबीयांबरोबरच प्रेक्षकांना जबर धक्का बसला आहे.