कतारमध्ये हनीमूनसाठी गेलेल्या मुंबईतील दांपत्याला ड्रग्जप्रकरणी 10 वर्षांची शिक्षा

कतारमध्ये हनीमूनसाठी गेलेल्या मुंबईतील दांपत्याला तेथील न्यायालयाने ड्रग्ज प्रकरणी दहा वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. या दांपत्याच्या बॅगेत चार किलो हशिश सापडले होते. त्या आधारावर ही शिक्षा सुनावली गेली. परंतु त्या हशिशशी या दांपत्याचा संबंध नसून त्यांना फसवले गेले असल्याचे चौकशीत दिसून आले आहे. त्यामुळे आता या दांपत्याच्या सुटकेसाठी मुंबईतील अंमली पदार्थ प्रतिबंधक शाखा (एनसीबी) प्रयत्न करत आहे.

मोहम्मद शारीक आणि ओनिबा कौसर शकील अहमद असे या दांपत्याचे नाव आहे. 2019 मध्ये ते हनीमूनसाठी कतारला गेले होते. तेथील विमातळावर त्यांच्या सामानाची तपासणी झाली. त्यावेळी त्यांच्या बॅगेत हशीश सापडले होते. कतारच्या सत्र न्यायालयाने त्यांना सश्रम कारावासाबरोबर कतारी चलनाप्रमाणे सहा लाख रियाल इतका दंडही ठोठावला.

ही माहिती मिळताच ओनिबा कौसर हिचे वडील शकील अहमद यांनी कतारमधील हिंदुस्थानी दूतावास तसेच मुंबईतील एनसीबीच्या महासंचालकांनाही पत्र लिहिले होते. आपल्या जावयाची मावशी तबस्सुम, रियाज कुरेशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुलगी व जावयाच्या बॅगेत हशीश टाकले होते, असे त्यांनी त्या पत्रात म्हटले होते. बॅगेत गुटखा आणि जर्दा असल्याचे त्यांनी आपल्या जावयाला सांगितले होते, असेही पत्रात नमूद होते. एनसीबीने त्यासंदर्भात चौकशी केल्यानंतर खरा प्रकार उघड झाला.

आपली प्रतिक्रिया द्या