परराष्ट्र सचिव पदासाठी हर्षवर्धन शृंगला, सय्यद अकबरुद्दीन, रुची घनश्याम यांची नावे चर्चेत

294

हिंदुस्थानचे परराष्ट्र सचिव विजय गोखले जानेवारी 2020 ला निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी परराष्ट्र सचिव म्हणून हिंदुस्थानचे अमेरिकेतील राजदूत हर्षवर्धन शृंगला, हिंदुस्थानचे संयुक्त राष्ट्र संघांतील कायमचे प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन आणि हिंदुस्थानच्या ब्रिटनमधील उच्चायुक्त रुची घनश्याम यांची नावे चर्चेत आहेत.

परराष्ट्र सचिव असलेले एस. जयशंकर परराष्ट्रमंत्री बनल्यानंतर त्यांच्या जागी विजय गोखले यांची नियुक्ती करण्यात आली. गोखले यांचा कार्यकाळ जानेवारी 2018ला संपत आहे. शृंगला हे अमेरिकेत हिंदुस्थानचे राजदूत असून ते एस. जयशंकर यांच्या जवळचे मानले जातात. या पदासाठी त्यांचीच नियुक्ती होणार असल्याची चर्चा आहे, मात्र अमेरिकेबरोबर मुक्त व्यापार करारासंबंधी चर्चा अंतिम टप्प्यात असल्यामुळे हा करार मार्गी लागत नाही तोपर्यंत त्यांना अमेरिकेशिवाय दुसरी जबाबदारी देण्यात येणार नाही. ते 1984 पासून प्रशासकीय सेवेत आहेत.

संयुक्त राष्ट्रसंघामध्ये हिंदुस्थानची बाजू मजबुतीने मांडणारे हिंदुस्थानचे संयुक्त राष्ट्रसंघातील कायमचे सदस्य सय्यद अकबरुद्दीन यांचे नावही परराष्ट्र सचिव पदासाठी चर्चेत आहे, मात्र ते एप्रिल 2020मध्ये निवृत्त होणार आहेत. परराष्ट्र सेवा खात्यातून 1985 सालापासून प्रशासकीय कारकीर्द सुरू करणाऱया अकबरुद्दीन यांना तीन महिन्यांसाठी हे पद सरकार देईल का तसेच ते शृंगला आणि रुची घनश्याम यांच्यापेक्षा ज्युनियर असल्यामुळे त्यांच्या नियुक्तीची शक्यता कमी आहे. हिंदुस्थानचे ब्रिटनमधील उच्चायुक्त रुची घनश्याम या 1982 सालापासून प्रशासकीय सेवेत असून त्या एप्रिल 2020मध्ये निवृत्त होणार आहेत. त्याचबरोबर आर्थिक व्यवहार सचिव टी. एस. तिरुमूर्ती आणि विजय ठाकूर सिंह यांचीही नावे चर्चेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या