नेमबाजपटू जसपाल राणा यांचे निधन, वयाच्या 49 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आशियाई क्रीडा स्पर्धेतील माजी पदक विजेते आणि प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक जसपाल राणा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने शुक्रवारी निधन झाले. त्यांनी वयाच्या 49 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. राणा यांच्या निधनाच्या वृत्ताने क्रीडा विश्वात शोककळा पसरली आहे.

हिंदुस्थान संघाच्या दमदार कामगिरीनंतर म्युनिकहून ते हिंदुस्थानात परतले होते. म्युनिकहून दिल्लीला प्रवास करत असताना जसपाल यांची प्रकृती बिघडली. दिल्लीला पोहोचल्यावर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने थेट विमानतळावरून मॅक्स रुग्णालयात दाखल झाले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

‘द्रोणाचार्य’ पुरस्कारप्राप्त जसपाल राणा यांनी हिंदुस्थानच्या नेमबाजीला उच्च स्तरावर नेण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांची देशासाठी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली होती. जसपाल राणा यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत चार सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन कांस्य अशी एकूण आठ पदके जिंकली होती. वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी त्यांनी 1994 च्या हिरोशिमा आशियाई क्रीडा स्पर्धेत 25 मीटर सेंटर फायर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते.