महागाईने तीन वर्षांचा रेकॉर्ड मोडला, नोव्हेंबर महिन्यात 5.54 टक्क्यांवर दर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. खाद्यपदार्थांच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे देशातील किरकोळ महागाईने नवा उच्चांक गाठला आहे. केंद्र सरकारच्या केंद्रीय सांख्यिकी कार्यालयातर्फे गुरुवारी जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार किरकोळ महागाईचा दर नोव्हेंबर महिन्यात 5.54 टक्क्यांवर पोहचला आहे. हा दर गेल्या तीन वर्षांतील उच्चांकी दर आहे.

एकीकडे औद्योगिक उत्पादनवाढीच्या दरात घसरण झाली असताना दुसरीकडे खाद्यपदार्थांच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे किरकोळ महागाईने नवा स्तर गाठला आहे. ऑक्टोबर महिन्यात 4.62 टक्के असणारा किरकोळ महागाईचा दर नोव्हेंबर महिन्यात 5.54 टक्क्यांवर पोहचला आहे. नोव्हेंबर 2018 मध्ये हा दर अवघा 2.33 टक्के इतका होता.

नोव्हेंबर महिन्यात खाद्यपदार्थांच्या महागाईचा दर 10.1 टक्के राहिला आहे. ऑक्टोबरमध्ये हा दर 7.89 टक्के होता आणि वर्षभरापूर्वी 2.61 टक्के होता. कांद्याच्या कडाडलेल्या दराचा परिणाम किरकोळ महागाईवर झाला आहे. कांद्याच्या दरात सप्टेंबर महिन्यात 45.3 टक्के आणि ऑक्टोबरमध्ये १९.६ टक्के वाढ झाली होती.

महागाईचा दर ४ टक्क्यांच्या आत ठेवण्याच्या सूचना
केंद्र सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला महागाईचा दर 4 टक्क्याच्या टप्प्यात ठेवण्यास सांगितले आहे. यात 2 टक्के मार्जिनही आहे. ऑक्टोबर महिन्यात महागाईचा दर 4.16 टक्क्यांवर पोहचला होता. नोव्हेंबरमध्ये तो वाढून 5.54 टक्क्यांवर पोहचला. किरकोळ महागाईचा दर जुलै 2016 मध्ये 6.7 टक्क्यांवर पोहचला होता.

महिना महागाई दर
जून 3.18 टक्के
जुलै 3.15 टक्के
ऑगस्ट 3.28 टक्के
सप्टेंबर 3.99 टक्के
ऑक्टोबर 4.62 टक्के
नोव्हेंबर 5.54 टक्के

औद्योगिक उत्पादनात घट
सांख्यिकी विभागाने जारी औद्योगिक उत्पादनांच्या आकडेवारीनुसार सलग तिसऱ्या महिन्यात उत्पादनात घट दिसून आली. इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रॉडक्शनमध्ये सप्टेंबर महिन्यात 4.3 आणि ऑगस्टमध्ये 1.1 टक्के घट झाली होती. ऊर्जा, खाण आणि उत्पादन क्षेत्रातील मंदीमुळे या निर्देशांकात अधिक परिणाम झाला.