
लेखिका, उद्योजिका सुधा मूर्ती यांचे राहणीमान अत्यंत साधे आहे. मात्र या साधेपणामुळे काही वेळा त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. सुधा मूर्तींसोबत घडलेला असाच एक किस्सा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुधा मूर्ती ब्रिटनचे हिंदुस्थानी वंशाचे पहिले पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या सासूबाई आहेत. मात्र यावर सहसा कोणाचा विश्वास बसत नाही. लंडनमधील हिथ्रो विमानतळावर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी मूर्ती यांच्या फॉर्मवरील यूकेमधील निवासी पत्ता ‘10 डाऊनिंग स्ट्रीट’, अर्थात ब्रिटनच्या पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान आणि कार्यालय असल्याचे वाचल्यानंतर त्यांना विमानतळावरच अडविले होते.
सुधा मूर्ती या इन्फोसिसचे सहसंस्थापक आणि उद्योगपती नारायण मूर्ती यांच्या पत्नी आहेत, तर त्यांची कन्या अक्षता या ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी आहेत. एप्रिलमध्ये सुधा मूर्ती यांना नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी नुकतीच ‘द कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी लावली होती. यावेळी सुधा मूर्ती यांनी लंडनमधील विमानतळावर घडलेला एक किस्सा सांगितला.
‘एकदा मी ब्रिटनला गेले होते, तेव्हा विमानतळावरील इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी मला माझा राहण्याचा पत्ता विचारला. त्यावेळी माझी मोठी बहीण माझ्यासोबत होती. मला वाटले की, मी ‘10 डाऊनिंग स्ट्रीट’ लिहावे. खरं तर माझा मुलगाही ब्रिटनमध्येच राहतो, पण मला त्याचा पूर्ण पत्ता काही केल्या आठवत नव्हता. मग मी शेवटी ‘10, डाऊनिंग स्ट्रीट’ असे लिहिले, तर ते इमिग्रेशन ऑफिसर माझ्याकडे बघून म्हणाले, ‘तुम्ही काय मस्करी करताय का माझी?’
यावर सुधा मूर्ती त्या अधिकाऱ्याला म्हणाल्या, ‘अरे नाही बाबा, मी तुला खरं सांगतेय. मी खरेच ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची सासू आहे.’ त्याला आधी वाटले मी थट्टा करतेय. तो तरी काय करणार बिचारा! मी एक 72 वर्षांची साधी बाई. एका पंतप्रधानांची सासू होऊ शकते यावर कोणाचाही विश्वास नाही, असेही पुढे त्या गमतीने म्हणाल्या.


























































