इंटरमिजिएट परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या सूचना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

22 व 23 फेब्रुवारी रोजी ऑनलाइन पद्धतीने होणारी शासकीय रेखाकला परीक्षा (इंटरमिजिएट) अखेर रद्द करण्यात आली आहे. दहावीच्या परीक्षेला बसलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांना कोणत्याही अडथळय़ाशिवाय ही परीक्षा देता यावी यासाठी बोर्डाची परीक्षा झाल्यानंतर एप्रिल महिन्यात ऑफलाइन पद्धतीने इंटरमिजिएट परीक्षा होणार आहे.

 महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ, बृहन्मुंबई कलाध्यापक संघ, शिक्षक भारती, शिक्षक परिषद अशा विविध संघटनांनी वेळोवेळी पाठपुरावा करून शासकीय रेखाकल परीक्षा घेण्यासाठी पाठपुरावा केला होता. मात्र कला संचालनालयाने ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचे जाहीर केल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर परीक्षा कशी देणार असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे पुन्हा एकदा शिक्षक संघटनांनी ऑफलाइन परीक्षांची मागणी केली. याप्रश्नी बृहन्मुंबई कलाध्यापक संघाचे अध्यक्ष हिरामण पाटील, राज्य कला शिक्षक महासंघाचे प्रदेश अध्यक्ष विनोद इंगोले, सरचिटणीस प्रल्हाद साळुंखे, शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील, शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन हा प्रश्न अखेर मार्गी लावला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी वाढीव शुल्क भरून रजिस्ट्रेशन केले आहे अशा विद्यार्थ्यांची फीदेखील परत केली जाणार असून याविषयीचे परिपत्रक लवकरच उच्च व तंत्रशिक्षण विभाग जारी करणार आहे.  एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षा ऑनलाइन घेण्याचे जाहीर केल्यानंतर राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. ऑनलाइन परीक्षा नेमकी कोणत्या स्वरूपाची असेल याविषयीची माहितीदेखील जाहीर न केल्यानंतर परीक्षा कशी द्यायची असा प्रश्न विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला होता. मात्र आता या परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होण्याचा निर्णय झाल्याने विद्यार्थी, शिक्षक, पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.