
>> शब्दांकन – निनाद पाटील
आपल्या आतल्या सकारात्मक ऊर्जेच्या रोषणाईने आयुष्यातला प्रत्येक क्षण आपण एक सोहळा म्हणून जगला पाहिजे, किंबहुना साजरा केलाच पाहिजे हे माझ्या आयुष्यातले तत्त्व आहे… सांगताहेत लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता प्रसाद खांडेकर.
माझ्या शरीराच्या अणुरेणूंमध्ये सकारात्मक ऊर्जा ओतप्रोत भरली आहे आणि ती माझ्या वागण्याबोलण्यातून आणि मुख्यतः कलाकृतीतून सातत्याने मला आणि माझ्या अवतीभवतीच्या साऱयांना जाणवत राहते.
आजदेखील तो दिवस मला लख्ख आठवतो आहे. आम्ही मित्रमंडळी एकत्र भेटायचो, गप्पा मारायचो, नाटकाच्या तालमी करायचो, पण त्या दिवशी मी गेलो तर तिथे कोणीच नव्हतं. प्रत्येक जण आपापल्या कामात बिझी होते. वेगळे काही प्रोजेक्ट्स मिळाले होते करायला त्यांना. माझ्या हातात मात्र ठोस असं काहीच नव्हतं. मला प्रचंड एकटं, एकाकी वाटायला लागलं. काय करावे सुचेना. एका वेगळ्याच मनःस्थितीमध्ये मी तडक घरी आलो. घरी पाहिलं तर बायको माहेरी गेली होती तिच्या आईला भेटायला… आणि मग मला क्षणभर काहीच सुचेना. कोणाशी बोलावं, काय करावं, मन कुठे मोकळं करावं… या मनःस्थितीतच मी माझ्या घराच्या माळ्यावर गेलो. तिथे मला एक जुनी वही दिसली. त्यावर ‘श्रीकांत’ असं लिहिलेलं होतं… लेखक महादेव खांडेकर. ‘‘अरे, बाबांनी काय लिहिलं असेल?’’ असं म्हणून मी ती वही वाचायला घेतली.
त्यात ‘श्रीकांत’ नावाच्या व्यक्तिरेखेचा अत्यंत खडतर जीवनप्रवास रेखाटला होता. खरं तर ती त्यांचीच गोष्ट होती, स्वतःच्या आयुष्याची. एका गावातून ते कसे शहरात आले आणि त्यांनी प्रचंड जिद्दीने आपल्या करीअरची सुरुवात केली, नंतर काही वाईट प्रवृत्तीच्या लोकांमुळे त्यांची नोकरी कशी गमवावी लागली, त्यांनी त्याही परिस्थितीतून कसा मार्ग काढला… हे सगळं वाचता वाचता माझ्याही नकळत पापण्या ओल्या झाल्या. मी विचार केला की, आज हातात काम नाही या क्षणी म्हणून मी इतका निराश झालो. मग वडिलांनी किती हालअपेष्टांनी दिवस काढले असतील बरं ?
त्यांच्या तुलनेत तर माझं दुःख कणभरसुद्धा नाही. स्वतःच्या जिद्दीवर, मेहनतीवर विश्वास ठेवून पुढे जाणं हे तर माझ्या हातात आहे आणि एका अनामिक ऊर्जेने मी पेटून उठलो. त्यानंतर एक एक कामं मिळत गेली आणि आज हा प्रवास यशस्वीपणे निरंतर चालू आहे. अर्थात माझ्याइतकीच पॉझिटिव्हिटी माझ्या मुलामध्ये, बायकोमध्ये आणि आईमध्येसुद्धा आहे.
हल्ली हल्लीची गोष्ट सांगायची तर माझा नवीन सिनेमा जो नुकताच रिलीज झालाय, ‘एकदा येऊन तर बघा’च्या शूटिंगदरम्यानसुद्धा प्रचंड अडचणी आल्या. गगनबावडय़ाला शूटिंग होतं, मुसळधार पाऊस होता. शूटिंग खोळंबलं होतं. टीममधले सर्व थोडे नर्व्हस झाले, पण मी मात्र पॉझिटिव्ह होतो की, यातूनही काही चांगलं घडणार. अगदी माझ्या सिनेमातली
कॅरेक्टरसुद्धा माझ्यासारखी सकारात्मक विचारसरणीची माझ्याकडून लिहिली गेली आहेत. ‘श्रावण’ ही व्यक्तिरेखा जिद्दीवर एक मोठं लॉजिंग बार्ंडग सुरू करण्याचं स्वप्न पाहतो. त्याची बायको रोहिणी, त्यांना बरीच वर्षे मूल नाही. तरीही निराश न होता सकारात्मक विचारांच्या आशेने जगत आहे.
‘कार्तिक’ ही व्यक्तिरेखासुद्धा अशीच. सतत नानाविध लटपटी करून काहीतरी नवनवीन काम करणारा… माझ्या लेखणीतून साकारलेल्या व्यक्तिरेखांमध्ये प्रत्येक जण जीवन छान जगतो आहे.
कितीही संकटं आली, अडचणी आल्या, अडथळे आले, निराशा आली तरी मी खचून जात नाही. कारण मला माझ्या आत असलेल्या पॉझिटिव्ह वाईबसवर स्वतःपेक्षाही जास्त भरवसा आहे.



























































