
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेत मुंबई इंडियन्सने गुरुवारी किंग्ज इलेव्हन पंजाबवर 48 धावांनी दणदणीत विजय मिळवला. मुंबईच्या विजयात कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याचा मोठा वाटा राहिला. त्याने 70 धावांची खणखणीत खेळी केली. या दरम्यान त्याने आयपीएलमध्ये नवीन विक्रमाला गवसणी घातली आणि विराट कोहली, सुरेश रैना यांच्या पंक्तीत स्थान मिळवले.
किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध सलामीला उतरलेल्या रोहितने डावाच्या दुसऱ्या षटकात चौकार ठोकत आयपीएलमध्ये 5000 धावांचा टप्पा ओलांडला. आयपीएल इतिहासात अशी कामगिरी आधी फक्त 2 खेळाडूंनी केली आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही खेळाडू हिंदुस्थानचे आहेत. याआधी आरसीबीचा कर्णधार विराट कोहली याने 180 लढतीत 5430 धावा आणि चेन्नई सुपर किंग्जचा खेळाडू सुरेश रैना याने 193 लढतीत 5368 धावा केल्या आहेत.
रोहित शर्मा याने 192 व्या लढतीत 5000 धावांचा टप्पा ओलांडला. यादरम्यान त्याने 1 शतक आणि 38 अर्धशतक ठोकले. यंदा सुरेश रैना खेळत नसल्याने त्याला मागे सोडण्याची नामी संधी ‘हिटमॅन’ रोहित शर्मा याच्याकडे आहे.
5000 runs in IPL for @ImRo45. Joins the likes of Suresh Raina and Virat Kohli.#Dream11IPL pic.twitter.com/EDA7u30pZb
— IndianPremierLeague (@IPL) October 1, 2020
मुंबई टॉपवर
दरम्यान, गुरुवारी मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 191 धावा केल्या. अखेरच्या 6 षटकात पांड्या आणि पोलार्ड यांनी 100 हून अधिक धावा चोपल्या. यानंतर बुमराह आणि राहुल चहर यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेत पंजाबला रोखले आणि 48 धावांनी विजय मिळवला. या विजयासह गुणतालिकेत मुंबईचा संघ 4 गुणांसह टॉपवर पोहोचला आहे.



























































