#IPL2021 तळाच्या संघांमधील लढाई! पंजाब-हैदराबादमध्ये काँटे की टक्कर

आयपीएलमध्ये उद्या तळाच्या संघांमधील लढाई तमाम क्रिकेटप्रेमींना पाहायला मिळणार आहे. लोकेश राहुलच्या पंजाब किंग्जला तीन लढतींमधून फक्त एकाच लढतीमध्ये विजय मिळवता आला आहे. डेव्हिड वॉर्नरच्या सनरायझर्स हैदराबादला तिन्ही लढतींमध्ये लाजिरवाण्या पराभवाचा चेहरा पाहावा लागला आहे. याच पार्श्वभूमीवर दोन्ही संघ चेन्नईत एकमेकांना भिडणार आहेत. याप्रसंगी पंजाब किंग्ज दुसऱया विजयासाठी प्रयत्न करील, तर सनरायझर्स हैदराबाद विजयाचे खाते उघडण्यासाठी सर्वस्व पणाला लावेल.

मधल्या फळीत धावांची कमतरता

कर्णधार लोकेश राहुल याने मागील मोसमात धावांचा पाऊस पाडला, पण पंजाब किंग्जला मात्र प्ले ऑफमध्ये पोहोचता आले नाही. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. त्यामुळे या खेळामध्ये 11 खेळाडूंनी आपली भूमिका चोख बजावायला हवी. लोकेश राहुल व मयांक अग्रवाल या सलामीवीरांनी चांगले प्रदर्शन केल्यानंतरही पंजाब किंग्जला दिल्ली पॅपिटल्सविरुद्धच्या लढतीत हार सहन करावी लागली. ख्रिस गेल, निकोलस पूरण यांच्यासह दीपक हुडा व शाहरुख खान यांना मधल्या फळीत सातत्याने दमदार फलंदाजी करायला हवी. लोकेश राहुलसोबत ख्रिस गेलला सलामीला पाठवून मयांक अग्रवालला मधल्या फळीत फलंदाजीला पाठवण्याची योजना पंजाब किंग्जला आखायला हरकत नाही. यामुळे मधल्या फळीत स्थिरता येईल.

परदेशी खेळाडूंवर मदार पण…

सनरायझर्स हैदराबादच्या संघाला आयपीएलच्या यंदाच्या मोसमात पहिल्या तिन्ही लढतींमध्ये पराभूत व्हावे लागले आहे. पहिल्या तीन लढतींतील कामगिरीकडे पाहता लक्षात येईल की, परदेशी खेळाडूंवरच हा संघ अवलंबून राहत आहे. कर्णधार डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो, राशीद खान व मुजीब उर रहमान या चौघांनी आपली छाप टाकली आहे, पण इतर खेळाडूंना चांगली कामगिरी करता आलेली नाही. परदेशी खेळाडूंवर जास्त प्रमाणात अवलंबून राहणे या संघाला फायदेशीर ठरणार नाही. स्थानिक तसेच हिंदुस्थानी खेळाडूंनीही आपली जबाबदारी पार पाडायला हवी. अन्यथा पराभवाचा चौकार ‘आ’ वासून उभा आहे.

गोलंदाजीत सातत्याचा अभाव

पंजाब किंग्जकडे मोहम्मद शमी, झाय रिचर्डसन यांसारखे अनुभवी गोलंदाज आहेत. तसेच अर्शदीप सिंग व रायली मेरेडीथ यांसारखे युवा मध्यमगती गोलंदाज त्यांच्या दिमतीला आहेत. पण या सर्व गोलंदाजांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरीचा अभाव प्रकर्षाने दिसून येत आहे. तसेच पाचव्या गोलंदाजाची कमतरताही यावेळी संघाला भासतेय. मागील लढतीत दीपक हुडा व जलाज सक्सेना यांच्याकडून पाचव्या गोलंदाजाची षटके पूर्ण केली गेली, पण संघाला त्याचा फायदा झाला नाही. याकडे त्यांना गांभीर्याने लक्ष द्यावे लागणार आहे.

आजची आयपीएल लढत

पंजाब किंज-सनरायझर्स हैदराबाद, चेन्नई
दुपारी 3.30 वाजता

आपली प्रतिक्रिया द्या