
टाटा आयपीएलचा अंतिम सामना संशयाच्या गर्तेत सापडला आहे. भाजप नेते, खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व त्यांचे पुत्र तथा बीसीसीआयचे सचिव जय शहा यांच्यावर टीकेचे यॉर्कर टाकून खळबळ उडवून दिली आहे. अंतिम सामन्यात फिक्सिंग झाल्याचा सनसनाटी आरोप स्वामी यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे. त्यांनी बीसीसीआयच्या एकूण कार्यपद्धतीवरच शंका व्यक्त केली आहे. त्यासाठी त्यांनी गुप्तचर संघटनांच्या इनपुटचाही हवाला दिला आहे.
आयपीएल फायनलमधील घोटाळय़ाची चौकशी व्हावी, याप्रकरणी न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याची गरज आहे, असे ट्विट करीत स्वामी यांनी आयपीएलच्या माध्यमातून आपल्याच पक्षाचे नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व त्यांचे चिरंजीव जय शहा आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) यांच्यावर टीकास्त्र्ा सोडले.
…तर अमित शहा यांना क्रीडामंत्रीपद द्यावे – स्वामी
जम्मू-कश्मीरमध्ये सध्या राष्ट्रपती राजवट आहे आणि तरीदेखील प्रत्येक दिवशी एका कश्मिरी हिंदूची गोळय़ा घालून हत्या केली जात आहे. यासाठी आता अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी करणे गरजेचे झाले आहे किंवा त्यांना क्रीडा मंत्रालय दिले जावे. कारण आजकाल त्यांना क्रिकेटमध्ये अधिक रस वाटू लागला आहे, असे सुब्रमण्यम स्वामी म्हणाले. अमित शहा 29 मे रोजी झालेल्या आयपीएलच्या 15 व्या हंगामाची फायनल मॅच पाहण्यासाठी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गेले होते. कश्मीर खोऱयात दहशतवादी हिंदूंच्या टार्गेट किलिंगचे थैमान माजवत असताना देशाचे गृहमंत्री आयपीएल फायनलचा आनंद लुटण्यासाठी कसे जातात, असा संतप्त सवालही खासदार स्वामी यांनी केला.
बीसीसीआयवर प्रश्नांचा भडिमार
खासदार स्वामी यांच्या ट्विटरवरील पोस्टमुळे आता एका नव्या वादाला सुरुवात झाली आहे. त्यांच्या पोस्टनंतर चाहते सोशल मीडियावरून युजर्स बीसीसीआय, राजस्थान रॉयल्स यांनाही प्रश्न विचारत आहेत. एका युजरने राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन याला टॅग करीत सवाल केलाय की, नाणेफेक जिंकूनदेखील प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय का घेतलास?


























































