IPL 2023 कोण गाठणार आज ‘आयपीएल’ची फायनल? गुजरात-चेन्नई क्लॉलिफायर -1 लढतीत भिडणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तब्बल 51 दिवस रंगलेल्या 70 साखळी लढतींनंतर ‘आयपीएल’ टी-20 क्रिकेट स्पर्धेतील ‘प्ले ऑफ’चे चित्र स्पष्ट झाले. गुजरात टायटन्स, चेन्नई सुपर किंग्ज, लखनौ सुपर जायंट्स व मुंबई इंडियन्स या चार संघांनी ‘प्ले ऑफ’चे तिकीट मिळविले. राजस्थान रॉयल्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसह उर्वरित सहा संघांना बॅगा भराव्या लागल्या. मंगळवारपासून (दि. 23) प्ले ऑफच्या लढतींचा थरार सुरू होणार आहे. गुजरात आणि चेन्नई यांच्यात क्वॉलिफायर-1चा सामना होणार असून, बुधवारी लखनौ आणि मुंबई हे संघ एलिमिनेटर लढतीत भिडतील. क्वॉलिफायर-1मधील पराभूत संघ आणि एलिमिनेटर लढतीतील विजयी संघ यांच्यात शुक्रवारी क्वॉलिफायर-2 लढत होईल. मग क्वॉलिफायर-1मधील विजेता व क्वॉलिफायर-2मधील संघ 28 मे रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनलमध्ये भिडतील.

धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जने आतापर्यंत खेळलेल्या 14 हंगामांपैकी सर्वाधिक 12 वेळा प्ले ऑफमध्ये धडक दिलेली आहे. बंदीच्या शिक्षेमुळे दोन वर्षे चेन्नईला आयपीएलमध्ये खेळता आले नव्हते. हार्दिक पंडय़ाच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सचे स्पर्धेतील हे दुसरे वर्ष होय. गतवर्षी पदार्पणातच त्यांची विजेतेपद पटकाविण्याचा पराक्रम केला होता. गुजरातने सलग दुसऱया वर्षी प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळविला आहे. चेन्नई संघ उद्या घरच्या मैदानावर गुजरातशी भिडणार आहे. या लढतीतील विजेता संघ आयपीएलची फायनल गाठणारा पहिला संघ ठरणार आहे. मात्र, क्वॉलिफायर-1 लढतीत पराभूत झालेला संघ एलिमिनेटर लढतीतील जिंकलेल्या संघासोबत क्वॉलिफायर-2 लढतीत भिडणार आहे.

चेन्नईमध्ये प्रथमच खेळणार गुजरातचा संघ

गुजरात-चेन्नई यांच्यातील क्लॉलिफायर-1 लढत चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर रंगणार आहे. प्ले ऑफमध्ये उभय संघ अद्यापि भिडलेले नसले तरी साखळी फेरीत तीनदा त्यांचा आमनासामना झालेला आहे. वेगवेगळ्या मैदानांवर झालेल्या या तीनही लढतींत गुजरातनेच बाजी मारलेली आहे. मात्र, आता चेन्नईला त्यांच्या घरच्या मैदानावर हरविण्याचे आव्हान गुजरात संघापुढे असेल. कारण धोनीचे कल्पक नेतृत्व व घरच्या प्रेक्षकांच्या पाठिंब्याच्या जोरावर चेन्नईचा संघ पटलवार करण्यासाठी सज्ज झाला आहे.

अनुभव विरुद्ध उत्साह

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज संघात अनुभवाची काही कमतरता नाही. दुसरीकडे हार्दिक पंडयाच्या नेतृत्वाखालील संघामध्ये कमालीचा उत्साह आहे. गुजरातने 14 साखळी लढतींमध्ये 10 विजय मिळविले असून, चेन्नईने आठ विजय मिळविले आहेत. चेन्नईकडे धोनीसह ऋतुराज गायकवाड, ड्वेन कॉन्वे, शिवम दुबे, रवींद्र जाडेजा, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायुडू असे एकाचढ एक फलंदाज आहेत. गोलंदाजीमध्ये तुषार देशपांडे, दीपक चहर, महिष थिक्षणा असे पर्याय आहेत. या त्रिकुटाच्या जोडीला जाडेजा व अली हे अष्टपैलू खेळाडू असतील. दुसरीकडे गुजरातच्या संघात वृद्धिमान साहा, शुभमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पंडय़ा, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान असे मॅचविनर फलंदाज आहेत. गोलंदाजीत मोहम्मद शमी व रशीद खान असे मॅच फिरविणारे दिग्गज गोलंदाज आहेत. गुजरातकडेही अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असून, गोलंदाजीत हा संघ चेन्नईपेक्षा थोडा सरस वाटतो. मात्र, तरीही अनुभव विरुद्ध उत्साह यात कोण बाजी मारणार? याबाबतची क्रिकेटप्रेमींमधील उत्पंठा टिपेला पोहोचली आहे.