
क्रिकेटप्रेमींची प्रतीक्षा अखेर संपली. बहुप्रतीक्षित आयपीएलच्या यंदाच्या मोसमाची फटकेबाजी येत्या 31 मार्चपासून गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्या लढतीने होईल. बीसीसीआयने आज आयपीएलच्या वेळापत्रकाची घोषणा करत क्रिकेट चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. आयपीएलचा अंतिम सामना 28 मेला खेळवला जाणार असल्यामुळे ही स्पर्धा 59 दिवस रंगेल.
आयपीएलची ब्लॉकबस्टर ओपनिंग करण्याची तयारी बीसीसीआयने केली आहे. त्यामुळेच त्यांनी पहिली लढत धोनी आणि हार्दिक पंडया या गुरूशिष्याच्या जोडीमध्ये होणार असून हा सामना सायंकाळी 7.30 वाजता अहमदाबाद येथे खेळविला जाणार आहे. स्पर्धेच्या दुसऱया दिवशी 1 एप्रिल रोजी डबल धमाका क्रिकेटप्रेमींना अनुभवता येणार आहे. 1 एप्रिल रोजी होणाऱया दोन सामन्यांतील पहिला सामना पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळविला जाईल तर दुसऱया सामन्यात लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली पॅपिटल्स एकमेकांशी भिडतील.
यंदाच्या आयपीएल मोसमात साखळी फेरीत 70 लढती खेळवल्या जाणार आहेत. त्यापैकी 18 लढती डबल हेडरमध्ये खेळविल्या जाणार आहेत. ज्या दिवशी दोन सामने खेळवले जातील, त्या दिवशी पहिला सामना दुपारी 3.30 वाजता, तर दुसरा सामना सायंकाळी 7.30 वाजता खेळविला जाईल.
‘अ’ आणि ‘ब’ गटातील संघ
आयपीएलच्या 10 संघांची विभागणी ‘अ’ आणि ‘ब’ गटात करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी ‘अ’ गटामध्ये मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स, कोलकता नाईट राईडर, दिल्ली पॅपिटल्स, लखनौ सुपर जायंट्स या संघांचा समावेश आहे. तर ‘ब’ गटामध्ये चेन्नई सुपर किंग्ज, पंजाब किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात टायटन्स या संघांचा समावेश आहे.

























































