IPL 2024 : विराट आणि जॅक्सची तुफान फलंदाजी, बंगळुरूचा गुजरातवर 9 विकेटने दणदणीत विजय

विराट कोहली आणि विल जॅक्स यांच्या तुफान फलंदाजीमुळे बंगळुरूची गाडी पुन्हा एकदा विजयाच्या ट्रॅकवर आली आहे. गुजरात टायटन्सने बंगळुरूला 201 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान बंगळुरूने 16 व्या षटकात पुर्ण करत गुजरातचा पराभव केला.

गुजरातने दिलेल्या 201 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेली RCB ची सलामीची जोडी विराट कोहली आणि कर्णधार ड्यु प्लेसिस यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. मात्र ड्यु प्लेसिसला (12 चेंडू 24 धावा) साई किशोरने बाद केले. 40 या धावसंख्येवर बंगळुरूला पहिला हादरा बसला. त्यानंतर विल जॅक्स आणि विराट कोहलीने सर्व सुत्र आपल्या हाती घेतली. विराट कोहलीने 44 चेंडूमध्ये 3 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 70 धावांची नाबाद खेळी केली. त्याला विल जॅक्सची साथ मिळाली विलने 41 चेंडूमध्ये 10 खणखणीत षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने नाबाद 100 धावा ठोकल्या. RCB ने तुफान फलंदाजी केली त्यामुळे 9 विकेटने गुजरातचा पराभव झाला.

गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी गुजरातला आमंत्रित केले. मात्र गुजरातची सुरुवात चांगली झाली नाही. गुजरातला पहिला धक्का वृद्धिमान सहाच्या (4 चेंडू 5 धावा) स्वरूपात अवघ्या सहा या धावसंख्येवर बसला. शुभमन गिल (19 चेंडू 16 धावा) मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला. मात्र यांच्यानंतर टीम इंडियाच्या युवा फलंदाजांनी आक्रमक खेळ केला. साई सुदर्शनने 4 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने नाबाद 84 धावा केल्या. त्याला शाहरुख खानने चांगली साथ दिली शाहरुखने 30 चेंडूंमध्ये 5 षटकार आणि 3 चौकारांच्या जोरावर 58 धावा केल्या. 131 या धावसंख्येवर शाहरुखच्या स्वरुपात गुजरातला तिसरा धक्का बसला. मात्र त्यानंतर मिलरच्या (19 चेंडू 26 धावा) साथीने साई सुदर्शनने संघाला 200 या धावसंख्ये पर्यंत पोहोचवले आणि बंगळुरूला विजयासाठी 201 धावांचे आव्हान दिले.