अंतराळात सामर्थ्य वाढवण्याचे लक्ष्य, ‘इस्रो’ पाच लष्करी उपग्रह सोडणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

अंतराळात लष्करी सामर्थ्य वाढवण्यासाठी हिंदुस्थानी अंतराळ संशोधन संस्था म्हणजे ‘इस्रो’ या वर्षात पाच लष्करी उपग्रह अंतराळात पाठवणार आहे. याची तयारीही सुरू झाली असून नुकतेच दोन टेहळणी उपग्रह अवकाशात सोडून ‘इस्रो’ने या उपक्रमाचा शुभारंभ केला आहे.

2016 मध्ये हिंदुस्थानने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकवेळी तसेच नुकत्याच झालेल्या बालाकोट एअरस्ट्राइकमध्ये हिंदुस्थानने जुन्या रिसॅट मालिकेतील उपग्रहांनी पाठवलेल्या छायाचित्रांचा वापर केला  होता. त्यानंतर आता सुरक्षेच्या दृष्टीने निरीक्षण क्षमता वाढवण्यासाठी अत्याधुनिक लष्करी उपग्रह अवकाशात सोडण्यात येणार आहेत. ‘इस्रो’ नव्या मालिकेतील चार रिसॅट उपग्रह आणि एक ऍडव्हान्स कार्टोसॅट-3 उपग्रहाचे प्रक्षेपण करणार आहे.

याआधी ‘इस्रो’कडून एका वर्षात एक किंवा दोन सैन्य उपग्रह अंतराळात पाठवले जात होते, मात्र पाकिस्तानकडून सातत्याने सीमेवर तणावाचे वातावरण निर्माण केले जात असल्याने तसेच हिंदी महासागरात चिनी नौदलाच्या हालचालींमध्ये झालेली वाढ यामुळे ‘इस्रो’चा दृष्टिकोन बदलला असून आता इस्रोने आपले संपूर्ण लक्ष्य अंतराळात सक्षमतेवर केंद्रित केले आहे.

आम्ही यंदा उपग्रह आणि रॉकेटस् मिळून 33 मोहिमा पार पाडण्याचे लक्ष्य ठेवले आहे. जुलैमध्ये रिसॅट-2R1, ऑक्टोबरमध्ये रिसॅट-2R2, नोव्हेंबरमध्ये रिसॅट-2 लाँच करण्यात येणार आहे. रिसॅट-2 मालिका ही गुप्त उपग्रहांचे सूक्ष्म स्वरूप आहे. यामध्ये एक्स-बँड सिंथेटिक अपर्चर रडार बसवण्यात आले आहेत. हे रडार ढगांच्या पलीकडीलही छायाचित्रे घेऊ शकतात. तसेच या छायाचित्रांना एक मीटर रिझॉल्युशनपर्यंत झूम करू शकतात, असे इस्त्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी सांगितले.