
सामना प्रतिनिधी, मुंबई
यापुढे जे.जे. मेडिकल कॉलेजमध्ये जे कार्यक्रम होतील किंवा कुठल्याही प्रकारचा समारंभ होईल त्यावेळी मुलींनी तोकडे कपडे घालू नये तसेच विद्यार्थ्यांनी कपड्याचे भान ठेवावे असे आदेश जे.जे. मेडिकल कॉलेजने विद्यार्थ्यांना दिले आहेत. गर्ल्स हॉस्टेलमधील विद्यार्थिनींनी कार्यक्रमांमध्ये तोकडे कपडे परिधान करून येऊ नयेत, तसेच सध्या सुरू असलेल्या ‘अस्तित्व’ या युवा महोत्सवातही असे कपडे टाळावेत अशा सूचना कॉलेजमधील गर्ल्स हॉस्टेलच्या वॉर्डन शिल्पा पाटील यांनी व्हॉट्सऍप मेसेजद्वारे विद्यार्थिनींना दिल्या.
होळीनिमित्त कॉलेजमध्ये आयोजित एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला होता. त्यानंतर कॉलेजचे अधिष्ठाता डॉ.अजय चंदनवाले यांनी विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये योग्य पोशाख परिधान करून येण्याबाबत सर्व विद्यार्थ्यांना सूचना केल्या होत्या. त्यानुसार शिल्पा पाटील यांनीही गर्ल्स हॉस्टेलमधील विद्यार्थिनींनी यापुढे कार्यक्रमांमध्ये तोकडे कपडे परिधान करून न येण्याबाबत तसेच महोत्सवातही असे कपडे टाळण्याबाबतचा मेसेज धाडला. दरम्यान, होळीनिमित्त आयोजित कार्यक्रमाबाबत झालेल्या गोंधळाची चौकशी करण्यात येईल असेही डॉ. चंदनवाले यांनी सांगितले.
























































