
सामना ऑनलाईन । इस्लामाबाद
हिंदुस्थानने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतावादी संघटनेचे अनेक दहशतवादी मारले गेले. यात मसूद अजहरच्या जवळच्या नातेवाईकांचा देखील समावेश होता. या हल्ल्यानंतर पाकिस्तानने मसूद अजहर खूप आजारी असल्याचा दावा केला होता मात्र आता त्यावर जैशने पहिल्यांदाचा प्रतिक्रीया दिली आहे. जैशच्या मुखपत्रातून मसूद अजहरने एक लेख लिहला असून त्यात आपण अगदी ठणठणीत असल्याचे त्याने म्हटले आहे. त्याच्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानचा खोटारडेपणा जगासमोर आला आहे.
हिंदुस्थानच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी मसूद अजहर खूप आजारी असून तो घराबाहेर देखील पडत नाही असा दावा केला होता. त्यानंतर आता ‘अल कलाम’ या जैश-ए-मोहम्मदच्या मुखपत्रात आज एक लेख प्रसिद्ध झाला असून त्यात मसूदने त्याला कोणत्याही प्रकारचा आजार नसून तो ठणठणीत असल्याचे म्हटले आहे.



























































