भार्गवरामा पाऊस दे…! शिवसेनेने केला महादेवाला जलाभिषेक

42

सामना प्रतिनिधी । धुळे

पुनर्वसु नक्षत्रात पाऊस झालेला नाही. अजूनही पेरण्या लांबल्या आहेत. काही गावांना टँकरने पाणीपुरवठा होत आहे. जनता सलग तीन वर्षे दुष्काळाचे चटके अनुभवत आहे. पावसाने आता अंत पाहू नये यासाठी शिवसेनेच्या वतीने फुलवाला चौकातील महादेव मंदिरात जलाभिषेक केला आणि भरपूर पाऊस होण्यासाठी महादेवाला साकडे घातले.

धुळे जिल्ह्यात यंदा अद्यापही पुरेशा प्रमाणात पाऊस झालेला नाही. साहजिकच दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. पावसाअभावी जेमतेम दहा टक्के क्षेत्रात खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. पेरणीची वेळ संपत आली तरी पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी चिंतातुर आहे. धुळे तालुक्यासह काही गावांना टँकरने पाणी पुरवठा होत आहे. पुनर्वसु नक्षत्रात सूर्याचे वाहन मेंढा आहे. त्यामुळे या नक्षात जोरदार पाऊस होईल असे सांगण्यात आले होते. परंतु पुनर्वसु नक्षत्र आता अंतिम चरणात आले तरीदेखील पावसाचा पत्ता नाही. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी फुलवाला चौकातील महादेव मंदिरात शंकराच्या पिंडीवर जलाभिषेक केला. धुळे जिल्ह्यासह महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस होऊ दे, गुरा-ढोरांना भरपूर चारा उपलब्ध होऊ दे अशी प्रार्थना महादेवाकडे करण्यात आली.

या वेळी जिल्हाप्रमुख हिलाल माळी, माजी आमदार शरद पाटील, सहसंपर्क प्रमुख अतुल सोनवणे, डॉ. सुशील महाजन, नरेंद्र परदेशी, भूपेंद्र लहामगे, राजेंद्र पाटील, गुलाब माळी, रामदास कानकाटे, भरत मोरे, संदीप सूर्यवंशी, रवी काकड, धिरज पाटील, प्रफुल्ल पाटील यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या