
जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील शेलगाव नजीक पांगरी फाट्यावर भरधाव वाळूच्या टिप्परने कारला साईडने धक्का दिल्याने भीषण अपघात घडला आहे. सोमवारी 6 फेब्रुवारी रोजी रात्री दहा ते साडेदहाच्या सुमारास हा अपघात घडला असून कारमधील दोघेही गंभीर जखमी आहेत. तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
जालन्याच्या चंदनझिरा येथील दोघे तरुण कारने संभाजीनगरहून जालन्याकडे येत होते. बदनापूर तालुक्यातील शेलगाव नजीक पांगरी फाट्यावर भरधाव टिप्परने कारला धडक दिल्याने भीषण अपघात घडला. यामध्ये कारच्या चुराडा झाला. या कारमधील धीरज अंभोरे(रा. चंदनझिरा) व विश्वनाथ श्रीधर मेत्रे(रा. सिंदखेड राजा) हे गंभीर जखमी झाले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच बदनापूर पोलीस ठाण्याचे एएसआय बुणगे , कॉन्स्टेबल कलानी, भगत, यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णलयात हलविण्यात आले. मात्र, एकाची प्रकृती चिंताजनक असून त्यास डॉक्टरांनी टाके देऊन संभाजीनगर येथे रेफर करण्यात आले असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. दरम्यान, धडक देऊन टिप्पर घेऊन चालक फरार झाला आहे.




























































