जळगावातील मेहरुण तलावात तरुणाचा बुडून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। जळगाव

शहरातील समता नगरातील वंजारी टेकडी येथे वास्तव्यास असलेल्या प्रवीण शिवाजी सनांसे ( २७) या तरुणाचा मेहरुण तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना 27 जानेवारी रविवारी दुपारी दोन वाजता उघडकीस आली. प्रवीण याचे कपडे, चप्पल व पाकीट तलावाकाठी गणेश घाटाजवळ आढळून आले आहेत. तो शनिवारी सायंकाळपासून घरातून गायब असल्याने ही आत्महत्या असावी अशीही शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

प्रवीण सनांसे हा शनिवारी सायंकाळपासून घरातून निघाला होता. रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने मोठा भाऊ दीपक व अन्य नातेवाईकांनी त्याचा रात्रभर शोध घेतला. रविवारी सकाळी फिरायला गेलेल्या एका पोलिसाला तलावाकाठी गणेश घाटावरील पायऱ्यावर त्याचे कपडे, चप्पल व पाकीट आढळून आले.समता नगरातील प्रवीण गायब असल्याचे समजल्याने तेथील तरुणांनी तलावाकडे धाव घेतली. तलावात प्रवीणचा शोध घ्यायला सुरुवात झाली. दीड तासानंतर प्रवीणचा मृतदेह लागला. प्रवीण हा अविवाहित होता. फर्निचर कामाचा तो उत्कृष्ट कारागीर होता. यंदा लग्न करण्याचे नियोजन होते, त्यासाठी कुटुंबाकडून स्थळ पाहण्याचेही काम सुरु झाले होते. मोठा भाऊ दीपक व दोन बहिणी अविवाहित आहेत. वडील सैन्य दलात होते.