
जम्मू-कश्मीरच्या अनंतनाग जिल्हय़ात लष्कराशी उडालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा झाला. यापैकी एक हिजबूल मुजाहिदीनचा असून तिघे लश्कर-ए-तोयबाचे आहेत. महिनाभरात झालेले हे तिसरे मोठे एन्काऊंटर आहे.
अनंतनाग जिल्हय़ात डियालगाम येथे दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कर, सीआरपीएफ तसेच स्थानिक पोलिसांनी संयुक्त कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले. जवानांनी घेराबंदी करताच अतिरेक्यांनी गोळीबार सुरू केला. रविवारी पहाटेपर्यंत ही चकमक सुरू होती. यात हिजबूल मुजाहिदीनचा कमांडर अर्शफ खान तसेच लश्कर-ए-तोयबाचे तारीक खान, झुबेर वाणी, मुजफ्फर वाणी हे ठार झाले. पथकाने घटनास्थळावरून मोठा शस्त्र्ासाठा जप्त केला.
जम्मू-कश्मीरमध्ये महिनाभरात घडलेले हे तिसरे एन्काऊंटर आहे. याअगोदर 9 मार्च रोजी शोपियांत तीन दहशतवादी चकमकीत ठार झाले होते. त्याअगोदर सोपोरमध्येही दहशतवाद्यांचे एन्काऊंटर करण्यात आले होते.
सोपोरमध्ये एक दहशतवादी पकडला
उत्तर कश्मीरमधील सोपोर येथे दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराने कोम्बिंग ऑपरेशन राबवले. यात जैश-ए-मोहंमदचा दहशतवादी दानीश अहमद काकरू याला अटक करण्यात आले. हंदवाडा येथेही पोलिसांनी शनिवारी रात्री दहशतवाद्यांना मदत करणाऱया दोघांना अटक केली.
























































