
प्रजासत्ताकदिनाला दोन दिवस उलटत नाही तोच जम्मू-कश्मीरमध्ये जोरदार धुमश्चक्री उडाली आहे. शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या चकमकीमध्ये पाच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. सुरक्षा जवानांनी लश्कर-ए-तोएबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या पाच दहशतवाद्यांना टिपले आहे. यात जैशचा कमांडर जाहिद वानी याचाही समावेश आहे. जम्मू-कश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी सुरक्षा जवानांचे हे मोठे यश असल्याचे म्हटले.
जम्मू-कश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री बडगाम जिल्ह्यातील चरारेश्रीफ आणि पुलवामा जिल्ह्यातील नायरामध्ये सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीमध्ये पाच दहशतवाद्यांना ठार मारण्यात सुरक्षा जवानांना यश आले. बडगाम जिल्ह्यात एक आणि पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांना कंठस्थान घालण्यात आले.
सुरक्षा जवानांनी मारलेल्या दहशतवाद्यांमध्ये जैश-ए-मोहम्मदचा टॉपचा कमांडर जाहिद मंजूर वानी याचाही समावेश आहे. 14 फेब्रुवारी 2019 ला लेटपुरामध्ये सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. हा हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांमध्ये जाहिद वानी याचाही समावेश होता, अशी माहिती जम्मू-कश्मीर पोलिसांनी दिली आहे.
सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये 12 तास चकमक सुरू होती. दोन्ही बाजूने तुफान गोळीबार झाला. यात एका पाकिस्तानी दहशतवाद्यासह अन्य चार जणांचा खात्मा करण्यात आला. मारलेल्या दहशतवाद्यांजवळून हत्यार आणि स्फोटकं, तसेच आपत्तीजनक सामग्री जप्त करण्यात आल्याची माहिती, जम्मू-कश्मीर पोलिसांनी ट्वीट करून दिली आहे.
JeM commander Zahid Wani among five terrorists killed in twin encounters within 12 hours
Read @ANI Story | https://t.co/eEh9vm93hP pic.twitter.com/0sQftd9228
— ANI Digital (@ani_digital) January 30, 2022
जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवादी पुन्हा एकदा दहशत पसरवण्याच्या मनसुब्याने सक्रिय झाले आहेत. मात्र हिंदुस्थानच्या वीर जवानांनी त्यांचा हा मनसुबा उधळून लावला. शनिवारी दोन ठिकाणी झालेल्या चकमकीत पाच दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले. नववर्षातील सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.

























































