वसंत आबाजी डहाके यांना ‘जनस्थान’ पुरस्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेचा समजला जाणारा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ कवी, कादंबरीकार, समीक्षक वसंत आबाजी डहाके यांना आज जाहीर झाला. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांनी डहाके यांच्या नावाची घोषणा केली. एक लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिनी नाशिक येथे पुरस्कार सोहळा होणार आहे.

कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार दोन वर्षांनी दिला जातो. यंदाच्या 15 व्या पुरस्काराच्या निवड समितीमध्ये संजय जोशी, सदानंद बोरसे, मोनिका गजेंद्रगडकर, विलास खोले, रेखा इनामदार -साने यांचा समावेश होता. या सर्व सदस्यांनी समकालीन वास्तवाचे भान जपणारे बहुआयामी प्रतिभावंत साहित्यिक वसंत डहाके यांची एकमताने निवड केली.

वसंत डहाके यांचे शुभवर्तमान, चित्रीलिपी, वाचाभंग हे कवितासंग्रह, तर अधोलोक, प्रतिबद्ध, मर्त्य या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. तसेच यात्रा- अंतरयात्रा, मालटेकडीवरून हे लेख संग्रह प्रसिद्ध आहेत.

1966 साली ‘योगभ्रष्ट’ या दीर्घ कवितेमुळे ते प्रकाशात आले. ’चित्रलिपी’ या संग्रहाकरिता 2009 सालच्या साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते. फेब्रुवारी 2012 च्या चंद्रपूर येथे झालेल्या 85 व्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.