‘आरएसएस’चे समर्थन करणारे तालिबानी मानसिकतेचे – जावेद अख्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तालिबानचं कृत्य हे रानटी असून ते निंदनीय आहे. त्याप्रमाणे आरएसएस, विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे समर्थन करणाऱयांची मानसिकता तालिबानी प्रवृत्ती आहे. या विचारधारेचे समर्थन करणाऱया लोकांना आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचं मत ज्येष्ठ कवी आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केलं आहे.

ज्या पद्धतीने तालिबानी हे मुस्लिम राष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न करतात त्या पद्धतीने आपल्याकडे काहीजण हिंदू राष्ट्राची संकल्पना मांडतात. आरएसएस, विहिंप आणि बजरंग दल आणि तालिबानसारख्या संघटनांच्या ध्येयांमध्ये कोणताही फरक नाही. या संघटनांच्या ध्येयाच्या मार्गात देशाचे संविधान एक अडथळा बनत आहे, परंतु जर संधी मिळाली तर ते घटनात्मक सीमाही ओलांडतील, असे जावेद अख्तर म्हणाले.

देशातील बहुतांश लोकसंख्या ही धर्मनिरपेक्ष विचारांची आहे. ते सभ्य असून एकमेकांचा आदर करतात. त्यामुळे त्यांना तालिबानी विचार आकर्षित करू शकत नाहीत. म्हणूनच हिंदुस्थान आताही नाही आणि भविष्यातही कधी तालिबानी बनू शकणार नाही असा विश्वास अख्तर यांनी व्यक्त केला.

हिंमत असेल तर तालिबानमध्ये जाऊन टीका करा; भाजपचे आव्हान

जावेद अख्तर यांचा चेहरा पुरोगामी असला तरी त्यांचे अंतरंग मात्र कट्टरतावादी आहे. बहुसंख्य हिंदू समाज असलेल्या देशात राहून तालीबानवर टीका करत आहेत. हिंमत असेल तर अख्तर यांनी तालिबानमध्ये जाऊन टीका करावी, असं आव्हान भाजपने दिलं आहे. तसेच आरएसएस, बजरंगदल आणि विश्व हिंदू परिषदेबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल हिंदूंची माफी मागावी, नाहीतर बदनामीचा खटला दाखल केला जाईल, असा इशारा भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी दिला आहे. दरम्यान, भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हिंदुत्व जावेद अख्तर यांना कळलेलच नसल्याचं म्हटलं आहे.