
विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मिंधे गटाचे सत्ताधारी कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे यांच्यात विधानभवनाच्या लॉबीमध्ये शाब्दिक चकमक आणि धक्काबुक्की झाली. यामुळे खळबळ उडालेली असून याचे पडसाद विधानसभेमध्येही उमटले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हा मुद्दा विधानसभेमध्ये उपस्थित करत चौकशीची मागणी केली.
“आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे लॉबीमध्ये धक्काबुक्की असे वृत्त माध्यमांनी दिले आहे. त्याची माहिती घ्यावी आणि सभागृहाला अवगत करावे. संबंधित सदस्यांनाही समज द्यावी. कारण हे गँगवार आपल्या दारात, सभागृहात आले असेल तर गंभीर प्रकरण आहेत. त्यामुळे आपण याची चौकशी करावी”, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली.
हे खोक्याचे प्रकरण
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात जे राजकारण केले, यात सभागृहाचा आखाडा झाला आहे. लोकांच्या प्रश्नापेक्षा स्वत:च्या व्यक्तीगत प्रश्नांमुळे आमदार आणि मंत्र्यांमध्ये वाद सुरू आहे. त्यामुळे विधानसभेच्या लॉबीत मंत्र्यांवर खोक्यांचे आमदार तुटून पडले. ही परिस्थिती भयानक असून महाराष्ट्राच्या लोकशाही लाजवणारी आहे. हे सगळे खोक्याचे प्रकरण असून खोक्यांसाठीच सर्वकाही सुरू आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली.
अडीच वर्षात सभागृहाचे संस्कार, संस्कृती धुळीस मिळाली
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना माध्यमांनी याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, आता विधानभवनामध्येही पोलीस, सुरक्षारक्षक लावावे लागतील. सत्ताधारी आमदार आणि मंत्र्यांमध्ये हमरीतुमरी होणे धक्कादायक आहे. गेल्या दीड वर्षात सभागृहाचे संस्कार, संस्कृती धुळीस मिळाली आहे. सरकारं पाडायची, पक्ष फोडायचे, पक्षातील लोकांशीही गद्दारांसारखे वागायचे हे संस्कार आणि संस्कृती आता पायऱ्यांच्या आतही आली आहे.
























































