फडणवीस खोटे बोलताहेत! त्यांनी केलेल्या बदल्यांची पारदर्शकता तपासावी लागेल – जयंत पाटील

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पोलीस अधिकाऱयांच्या बदल्याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस धादांत खोटे बोलत आहेत. फडणवीस यांनी गृहमंत्री असताना आस्थापना बोर्डाला डावलून पोलीस अधिकाऱयांच्या थेट बदल्या केल्या होत्या. त्यातील पारदर्शकता तपासावी लागेल, असा हल्लाबोल जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केला.

दरम्यान, राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पोलिसांच्या बदल्याबाबतचा दिलेला अहवाल खोटा आहे. त्यांना फोन टॅपिंगचा आदेश पुणी दिला? हे फोन टॅपिंग कुणाच्या आदेशाने आणि कुणाच्या परवानगीने झाले, याची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.

सांगली महापालिकेत झालेल्या बैठकीनंतर जयंत पाटील पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, राज्यातील वरिष्ठ अधिकाऱयांच्या बदल्या पोलीस आस्थापना बोर्डाच्या शिफारशीनुसार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे बदल्याबाबत शुक्ला यांचा अहवाल खोटा आहे. फडणवीस यांनी दिलेली उदाहरणे चुकीची असून, असे काहीच घडलेले नाही. उलट फडणवीस गृहमंत्री असताना आस्थापना बोर्डाला डावलून पोलीस अधिकाऱयांच्या थेट बदल्या केल्या होत्या. त्यांच्या काळात किती अधिकाऱयांच्या थेट बदल्या केल्या हे त्यांनी जाहीर करावे, असे आव्हानही पाटील यांनी दिले आहे.

भाजपकडून ऊठसूट राष्ट्रपती राजवटीची मागणी!

राज्यात काहीही घडले तरी भाजपकडून राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी केली जाते. एखादी घटना घडल्यावर त्याचा तपास व्हावा, चौकशी व्हावी, असा त्यांचा आग्रहच नसतो. ऊठसूट राष्ट्रपती राजवटीची मागणी केली जाते. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते म्हणून चांगले रुळले आहेत; पण त्यांचा डोळा सत्तेकडेही आहे. त्यामुळे ते विरोधी पक्षनेतेपदालाही न्याय देऊ शकणार नाहीत असा चिमटाही जयंत पाटील यांनी काढला.