रॅपरविरोधातील कारवाईवरून विरोधक आक्रमक; जयंत पाटील म्हणाले, ‘एखादा शब्द अश्लील आहे की…’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रॅपच्या माध्यमातून मिंधे सरकारच्या गद्दारीची लक्तरे वेशीवर टांगणाऱ्या रॅपरविरोधात सुरू असलेल्या कारवाईवरून विरोधक आक्रमक झाले आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही पक्षाची भूमिका स्पष्ट करत राज्य सरकारच्या या कारवाईविरोधात नाराजी व्यक्त केली..

गेले काही दिवस महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्हयातील युवक व्यवस्थेवर कडक शब्दात टीका करणारी रॅप सॉंग्स तयार करत आहेत. या युवकांवर गुन्हे दाखल करणे, त्यांना पोलीस स्टेशन्सला बोलावून बसवून ठेवणे, त्यांच्या कुटुंबियांना घाबरवण्याचे प्रकार पोलिसांकडून सुरु आहेत, याबाबत तीव्र नाराजी जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

एखादा शब्द अश्लील आहे की नाही याबाबत प्रत्येकाचे मत वेगवेगळे असू शकते. एखाद्या ठिकाणी सर्रास वापरला जाणारा शब्द कोणाला अश्लील वाटू शकतो. म्हणून कोणाच्याही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधने घालता येणार नाहीत असे खडेबोल जयंत पाटील यांनी सरकारला सुनावले आहेत. व्यवस्थेवर कडक शब्दात रॅप सॉंग्सच्या माध्यमातून टिका करणार्‍या युवकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत असून अशा युवकांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस सर्व शक्तीनिशी उभी राहिल अशी ग्वाही त्यांनी दिली.

आतापर्यंत यांच्यावर करण्यात आली कारवाई

– ‘चोर आले बघा पन्नास खोके घेऊन…’ या रॅपने मिंध्यांच्या गद्दारीची लक्तरे महाराष्ट्राच्या वेशीवर टांगणाऱ्या राज मुंगासे याच्यावर कारवाई.

– सरकारचे डोके की खोके, भोंगळी केली जनता, या रॅपद्वारे महागाई, बेरोजगारीविरोधात आवाज उठवणाऱ्या रॅपर उमेश खाडे याला अटक.

– शुभम जाधव या रॅपरला पुण्यातील चतुश्रुंगी पोलिसांनी ताब्यात घेतले.