
सामना ऑनलाईन । अहमदाबाद
सुरतमधील एका महिलेने बलात्काराचा आरोप केल्यानंतर भाजपचे माजी आमदार जयंती भानुशाली (५३) यांनी गुजरात भाजप उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. माझ्यावर झालेल्या आरोपांतून मी निर्दोष मुक्त होत नाही तोपर्यंत मला उपाध्यक्षपदाचा जबाबदारीमधून मुक्त करावे असे भानुशाली यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष जितू वाघानी यांना सादर केलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे, हा राजीनामा वाघानी यांनी स्वीकारला आहे.
एका प्रसिद्ध फॅशन डिझायनिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देतो असे खोटे आश्वासन देऊन जयंती भानुशाली यांनी माझ्यावर असंख्य वेळा बलात्कार केला, असा आरोप सुरत येथील एका महिलेने अहमदाबाद पोलीस आयुक्तालयात सादर केलेल्या पत्रात केला आहे. आपल्यावर लैंगिक अत्याचार होत असल्याचा व्हिडीओ भानुशाली यांच्या एका सहाय्यकाने चित्रीत केलेला असून यामागे आपल्याला ब्लॅकमेल करण्याचा उद्देश आहे, असे या महिलेने आपल्या पत्रात म्हटले आहे.
























































