
कोपरगाव तालुक्यातील जेऊर पाटोदा येथील 23 वर्षीय तरुण मनीष दिलीप गरुड हा त्यांच्या राहत्या घरात गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मनीष याने आत्महत्या केला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की, शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या जेऊर पाटोदा शिवारातील 23 वर्षीय तरुण मनीष दिलीप गरुड हा काल रविवार, दिनांक 16 एप्रिल रोजी दुपारी दोन वाजण्याच्या पूर्वी त्यांच्या राहत्या घरात गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला होता. नातेवाईकांनी व नागरिकांनी त्याला औषधोपचारकरिता ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मयत घोषित केले.
या प्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसुंदर यांच्या खबरीवरून शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी सीआरपीसी. 174 प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल के. ए. जाधव करत आहेत.
दरम्यान मृत मनीष हा मयत होण्यापूर्वी आपल्या मित्रांसमवेत कोपरगाव अमरधाम येथे गेला होता आणि त्याने मित्रांसोबत फोटोसेशनही केले असल्याची माहिती त्याच्या मित्रांनी दिली आहे. त्यामुळे त्यांच्या मित्रांनाही चांगलाच धक्का बसला आहे. यावेळी ग्रामीण रुग्णालयात मयत मनीष यांच्या नातेवाईक, मित्रपरिवार यांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.


























































