
दहाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून जिओने ग्राहकांसाठी एक विशेष ऑफर जाहीर करत जुन्या आणि 2 जीसारख्या धीम्या नेटवर्कच्या कचाटय़ात अडकलेल्या ग्राहकांसाठी हाय-स्पीड 4 जी असलेला फोन उपलब्ध केला आहे. ‘जिओभारत 4 जी’ असे या फोनचे नाव असून 1,499 रुपये किमतीच्या फोनसोबत ग्राहकांना सहा महिन्यांचा रिचार्ज मोफत मिळणार आहे.
‘जिओभारत 4 जी’ फोन ऑफरअंतर्गत सहा महिन्यांच्या कालावधीत ग्राहकांना दरमहा 14 जीबी डेटा आणि अमर्याद एचडी व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. त्यामुळे फोन खरेदी केल्यानंतर ग्राहकांना पुढील सहा महिने रिचार्जवर वेगळा खर्च करावा लागणार नाही. कंपनीने ही ऑफर विशेषतः सध्या 2 जी फीचर फोन वापरणाऱया ग्राहकांना 4 जी नेटवर्कवर आणण्यासाठी सादर केली आहे. ग्राहकांना जलद इंटरनेटसोबतच जिओटीव्हीचे 500 हून अधिक चॅनेल्स, ‘जिओ हॉटस्टार’वर चित्रपट व क्रीडा सामने, संगीत तसेच जिओपेद्वारे यूपीआय पेमेंटची सुविधा मिळणार आहे. या फोनमध्ये 2.4 इंचांचा डिस्प्ले आणि 2000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. ही ऑफर ‘जिओभारत’च्या निवडक ए 1, बी 1, बी 2 आणि बी 3 मॉडेल्सवर लागू असणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.
फक्त 299 अतिरिक्त खर्च
सामान्यतः 2 जी फोन वापरणारे ग्राहक दरमहा सुमारे 199 रुपयांचे रिचार्ज करतात, ज्याचा सहा महिन्यांचा खर्च सुमारे 1,200 रुपये होतो. मात्र 1,499 रुपयांच्या फोनमध्ये 6 महिन्यांचे रिचार्ज समाविष्ट असल्याने ‘2 जी’वरून ‘4 जी’वर अपग्रेड करण्यासाठी केवळ 299 रुपये अतिरिक्त खर्च येणार आहे. मात्र खरेदीच्या वेळी ग्राहकांना 1,499 रुपये एकत्र द्यावे लागणार असल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.




























































