
महाराष्ट्राबरोबरच देशाला अधिक उत्तम दर्जाचे खेळाडू मिळावे तसेच तरुणांमध्ये खेळाला अधिक वाव देण्यासाठी आपल्या विधानसभा क्षेत्रात प्राधान्य देण्यासाठी जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रवींद्र वायकर यांनी गोकुळधाम येथे आमदार निधीतून उभारण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बॅडमिंटन कोर्टाचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले.
गोकुळधाम येथील यशोधाम वेल्फेअर असोसिएशनच्या मैदानात जनतेच्या मागणीनुसार बॅडमिंटन कोर्ट उभारण्यात यावे अशी मागणी वेल्फेअर असोसिएशन यांनी आमदारांकडे केली होती. विभागाचे माजी नगरसेवक स्वप्नील टेंबवलकर यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. त्यानुसार आमदार विकास कार्यक्रमाअंतर्गत अंदाजे तब्बल 38 लाख खर्च करून म्हाडाच्या माध्यमातून हे कोर्ट तयार करण्यात आले आहे. महाराष्ट्र तसेच देशपातळीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत यासाठी आमदार वायकर यांच्या आमदार निधीतून हे कोर्ट उभारण्यात आले आहे. या कोर्टच्या लोकापर्णावेळी माजी नगरसेवक स्वप्नील टेंबवलकर, वर्षा टेंबवलकर, शालिनी सावंत, शाखाप्रमुख संदीप गाढवे, सुगंधा शेटये, अपर्णा परळकर, मयूरी रेवाळे आदी उपस्थित होते.





























































