पाचवी कसोटी रद्द झाल्याचे पडसाद, ‘आयपीएल 2021’मधून इंग्लंडच्या आणखी तीन खेळाडूंची माघार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयपीएलमुळे हिंदुस्थानच्या खेळाडूंनी मँचेस्टर येथे होणारा पाचवा कसोटी सामना खेळण्यास नकार दिल्याचा आरोप होत असतानाच आता इंग्लंडच्या काही खेळाडूंनी या स्पर्धेतून माघार घेतली आहे. 19 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या उर्वरित पर्वातून आतापर्यंत इंग्लंडच्या तीन खेळाडूंनी आपले नाव मागे घेतले आहे. पाचवी कसोटी रद्द झाल्याचे हे पडसाद असल्याची चर्चा क्रिकेटच्या वर्तुळात रंगत आहे.

इंग्लंडच्या डेव्हीड मलान, जॉनी बेअरस्टो आणि ख्रिस ओक्स यांनी यूएईमध्ये होणाऱ्या आगामी आयपीएलच्या उर्वरित सत्रात सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. डेव्हीड मलान हा टी-20 क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू असून आयपीएलमध्ये तो पंजाब किंग्ज संघाचे प्रतिनिधित्व करतो. तर ख्रिस ओक्स हा दिल्ली कॅपिटल्स आणि जॉनी बेअरस्टो हा सनरायझर्स हैदराबाद संघाचा सदस्य आहे. हे तिन्ही खेळाडू हिंदुस्थान आणि इंग्लंड संघातील कसोटी मालिकेमध्ये दिसले होते.

दरम्यान, मलान, वोक्स आणि बेअरस्टोआधी इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स आणि यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलर यांनीही आयपीएलमधून माघार घेतली होती. मात्र इंग्लंडचे अन्य 10 खेळाडू आयपीएलसाठी रवाना होणार असल्याची माहिती मिळत आहे.

IPL आणि पैशांसाठी पाचवा कसोटी सामना रद्द केला, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा आरोप

27 दिवसात 31 सामने

दरम्यान, आयपीएलच्या उर्वरित स्पर्धेची सुरुवात 19 सप्टेंबर 2021 रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स या मॅचने होईल. ही मॅच दुबईत होणार आहे. आयपीएलच्या राहिलेल्या 31 मॅच 27 दिवसांत खेळवल्या जातील. यासाठी 19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत मॅच होतील. एकूण 13 मॅच दुबईत, 10 मॅच शारजात आणि 8 मॅच अबुधाबीत होतील. सात दिवशी डबल हेडर असतील म्हणजे एकाच दिवशी दोन मॅच होतील.

किती वाजता सुरू होईल सामना?

आयपीएलमध्ये डबल हेडर असल्यास पहिली मॅच हिंदुस्थानी वेळेनुसार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरू होईल आणि दुसरी मॅच हिंदुस्थानी वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरू होईल. ज्या दिवशी आयपीएलमध्ये एकच मॅच असेल त्या दिवशी मॅच हिंदुस्थानी वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरू होईल.