
महानगर प्रेस असोसिएशन ऑफ भिवंडी आयोजित पत्रकार चषक जिल्हास्तरीय भव्य क्रिकेट स्पर्धेत चुरशीच्या अंतिम सामन्यात शहापूर पत्रकार इलेव्हन संघाने ठाणे शहर दैनिक पत्रकार संघावर मात करत बाजी मारली. शहापूरचा विकास डोंगरे ‘मालिकावीर’ ठरला.
भिवंडीचे माजी आमदार रूपेश म्हात्रे यांच्या हस्ते स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.
भिवंडीतील भिनार येथील चामुंडा रोडवरील डी. डी. स्पोर्टस्च्या भव्य क्रीडा संकुलात पत्रकार अनिल वर्मा आणि रवी वर्मा यांच्या वतीने पार पडलेल्या या क्रिकेट स्पर्धेत ठाणे जिह्यातील 12 संघ सहभागी झाले होते.
प्राथमिक फेरीत उल्हासनगर संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात शहापूर इलेव्हन पत्रकार संघाने उपांत्य सामन्यात भिवंडी संघावर लीलया मात केली. अंतिम सामन्यात शहापूर पत्रकार संघाने ठाणे पत्रकार संघावर सहज मात केली. शहापूरच्या विजयात कर्णधार रवींद्र लकडे, अनिल घोडविंदे, नरेश जाधव, किशोर शेलवले, वसंत पानसरे, उमेश जोशी, दिनेश पाचघरे, प्रकाश फर्डे, रवींद्र धारवणे यांचे योगदान लाभले तर मनोहर पाटोळे, हरेश साबळे, प्रशांत गडगे, जयवंत भडांगे यांसह अनेक पत्रकारांनी टीमला प्रोत्साहित केले.

























































