
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
सीबीआयचे हंगामी प्रमुख एम. नागेश्वर राव यांच्या नियुक्तीला आव्हान देणाऱ्या खटल्यातून सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या पाठोपाठ सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश ए. के. सिक्री यांनीही अंग काढून घेतले आहे. दरम्यान आता या खटल्याची सुनावणी दुसऱ्या खंडपीठासमोर शुक्रवारी होणार आहे. नागेश्वर राव यांना सीबीआयचे हंगामी प्रमुख म्हणून केंद्र सरकारने नियुक्त केले. या नियुक्तीला कॉमन कॉज या स्वयंसेवी संस्थेने कोर्टात आव्हान दिले आहे. या आव्हान याचिकेवरील सुनावणीतून सिक्री यांनी अंग काढून घेतले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने आलोक वर्मा यांची सीबीआयप्रमुख पदावरून हकालपट्टी केली. या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीला न्या. सिक्री हे सरन्यायाधीशांचे प्रतिनिधी होते म्हणून उपस्थित राहिले होते. आज नागेश्वर राव यांच्या याचिकेवर सुनावणी सुरू झाली तेव्हा सिक्री म्हणाले, माझी परिस्थिती समजून घ्या. या याचिकेवर मी सुनावणी घेऊ शकत नाही. यावर दवे म्हणाले, हे अत्यंत निराश करणारे आहे. या याचिकेवर तुमच्या न्यायाधीशमहोदयांना सुनावणी घ्यायची नाही, असा अर्थ ध्वनित होतो. यावर सिक्री म्हणाले, मी खटल्यातून माघार घेत आहे. मी काहीही अधिक सांगू शकत नाही.




























































