150 रुपये चोरल्याचा आरोप केला म्हणून अल्पवयीन मुलाने केली वडिलांची हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

अवघे 150 रुपये चोरल्याचा आरोप केला म्हणून एका अल्पवयीन मुलाने स्वतःच्याच वडिलांची हत्या केल्याची भयंकर घटना दिल्लीत घडली आहे. पोलिसांनी या मुलाला अटक केली आहे.

जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना ज्या दिवशी घडली त्या दिवशी आरोपीच्या वडिलांचे 150 रुपये सापडत नव्हते. त्यामुळे त्यांना ते आपल्याच मुलाने चोरले असावेत असा संशय आला. त्यावरून त्यांनी मुलगा आणि बायकोसोबत वाद घालायला सुरुवात केली. वाद सुरू असताना संतापाच्या भरात मुलाने भाजी चिरायच्या चाकूने वडिलांवर प्राणघातक हल्ला केला. त्याने अत्यंत निर्घृणपणे वडिलांच्या छातीवर वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वडिलांना त्यानेच रुग्णालयात दाखल केलं. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आधी त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली मात्र काही वेळाने गुन्हा कबूल केला.

आरोपीच्या म्हणण्यानुसार, त्याचे वडील त्याचा आणि त्याच्या आईचा सतत अपमान करत असत. यावेळीही त्यांनी 150 रुपये चोरल्याचा आरोप त्याच्यावर केला होता. त्यामुळे त्याने वडिलांची हत्या केली, अशी कबुली आरोपीने दिली आहे. आरोपीच्या कुटुंबाच्या म्हणण्यानुसार तो अल्पवयीन आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याची रवानगी बालसुधारगृहात केली आहे.