
नगर-पाथर्डीमार्गे जात असलेल्या कल्याण – विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गाचे गेल्या पाच वर्षांपासून काम रखडलेले आहे. परिणामी करंजी, देवराई, जांबकौडगाव येथे अर्धवट व खराब रस्त्यांमुळे दररोज मोठय़ा प्रमाणात धूळ उडत असून, या धुळीमुळे येथील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले असून, पिकांनाही धोका निर्माण झाला आहे. त्याचबरोबर रखडलेल्या कामांमुळे प्रवाशांमधूनही संताप व्यक्त होत आहे.
कल्याण-विशाखापट्टणम महामार्गाच्या रुंदीकरणासाठी व डांबरीकरणासाठी निधी मंजूर झाल्यानंतर पुढील सहा महिने या कामाला चांगली गती मिळाली. त्यानंतर मात्र या रस्त्याची दशाच बदलून गेली. करंजी गावाजवळ काढण्यात आलेला बायपास तसेच उत्तरेश्वर मंदिर, बसस्थानक परिसरात या महामार्गाचे सुरू असलेले काम पाहता या रस्त्याचे ना अतिक्रमण हटवले ना रुंदीकरण केले. उलट पहिल्यापेक्षा सध्या अधूनमधून काम सुरू राहणाऱया या रस्त्याचे काम आणखीनच निकृष्ट पद्धतीचे होत आहे.
रखडलेल्या कामामुळे व वाहनांच्या वर्दळीमुळे मोठय़ा प्रमाणावर धूळ उडत आहे. या धुळीमुळे महामार्गालगत असणाऱया सर्व ग्रामस्थांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. महिनाभरापूर्वी करंजी गावाजवळील बायपासचे काम सुरू करण्यात आले. त्यानंतर 15 दिवसांत हे काम बंद करून देवराई गावाजवळील बायपासचे काम सुरू करण्यात आले. आता दोन्ही ठिकाणचे काम सध्या बंद आहे.
नगर-पाथर्डी रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अनेक प्रवासी तीसगाव मांडवा मार्गे कोल्हार घाटातून नगरला जातात. तर, काही प्रवासी पाथर्डी-माणिकदौंडीमार्गे नगरला ये-जा करतात. या महामार्गाचे काम तत्काळ पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आमदार मोनिका राजळे व राष्ट्रवादीचे ऍड. प्रतापराव ढाकणे यांनी स्वतंत्रपणे भेट घेऊन केली आहे.
बाभळेश्वर-नेवासा फाटा रस्त्यावरही धूळच धूळ
z मराठवाडा, विदर्भात जाणारा नगर-संभाजीनगर महामार्ग व उत्तर महाराष्ट्रात जाणारा नगर-मनमाड महामार्ग या दोन महामार्गांना जोडणारा बाभळेश्वर ते नेवासाफाटा हा अत्यंत महत्त्वाचा राज्यमार्ग आहे. त्यामुळे या राज्यमार्गावर दिवस-रात्र वाहनांची मोठी वर्दळ सुरू असते. त्यातच ऊसगळीत हंगाम सुरू असताना हा राज्यमार्ग वाहनांनी फुलला आहे. शिर्डीला येणाऱया-जाणाऱया भक्तांचीही मोठी वर्दळ या राज्यमार्गावर असते. अत्यंत वर्दळीच्या असलेल्या या राज्यमार्गाची दुरवस्था गेल्या दोन वर्षांपासून झाली आहे. राज्यमार्गाच्या दुरुस्तीचे गेल्या एक वर्षापूर्वी काम सुरू आहे. दुरुस्तीचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. त्यामुळे दिवस-रात्र मोठय़ा प्रमाणात धुळीचे लोट दिसून येतात. ही धूळ राज्यमार्गावरून प्रवास करणाऱया प्रवाशांना व परिसरातील नागरिकांना मोठी डोकेदुखी ठरत आहे.
महामार्गाच्या रखडलेल्या कामांसंदर्भात संबंधित ठेकेदाराला नोटिसा देण्यात आल्या आहेत. या रस्त्याच्या रखडलेल्या कामाबाबत वरिष्ठ पातळीपर्यंत तक्रारी पोहोचलेल्या असल्याने नोव्हेंबरअखेर या महामार्गाच्या रखडलेल्या कामासंदर्भात वरिष्ठ पातळीवर मोठा निर्णय होऊन अर्धवट काम लवकर पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले जातील.
– स्मिता पवार, उपविभागीय अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग, पाथर्डी.
महामार्गाचे काम गेल्या अनेक दिवसांपासून रखडल्याने व अर्धवट कामांमुळे दररोज लहान-मोठे अपघात होत आहेत. यापूर्वी अनेकांचा अपघातामुळे बळी गेला आहे. या रखडलेल्या कामांबाबत सर्वसामान्यांच्या भावना तीव्र आहेत. ही बाब अधिकाऱयांनी समजून घेणे महत्त्वाचे आहे.
– बाबा पाटील-खर्से, ग्रामस्थ, करंजी.
































































