
मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेतील कर्मचाऱयांना पाच महिन्यांचा कोरोना भत्ता मिळालेला नाही. त्याचबरोबर सानुग्रह अनुदान (बोनस) तसेच आहार व जोखीम भत्ता मिळालेला नाही. कोरोना काळातही जिवाची बाजी लावून क्षयरोग निर्मूलनासाठी कार्यरत असणाऱया या कर्मचाऱयांना कोरोना, जोखीम भत्ता तसेच सानुग्रह अनुदान द्यावे नाहीतर बेमुदत आंदोलन करू, असा इशारा म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने पालिका प्रशासनाला दिला आहे.
जगभरात कोरोनाचा कहर सुरू आहे. मुंबईतही कोरोना काळात मुंबई महापालिकेच्या अखत्यारित येत असलेले मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेतील सुमारे 3 हजार 500 कर्मचारी जिवाची पर्वा न करता अत्यंत तुटपुंज्या मानधनावर काम करत आहेत. कोरोना काळातही आपले कर्तव्य चोख बजावणाऱया या कर्मचाऱयांना दरदिवशी 300 रुपये कोरोना भत्ता देण्याचे महापालिकेने मान्य केले होते. मात्र 8 महिने होऊन गेले तरी ऑगस्ट ते डिसेंबर 2020 या पाच महिन्यांचा कोरोना भत्ता या क्षयरोग कर्मचाऱयांना मिळालेला नाही. मुंबई क्षयरोग अधिकारी (सीटीओ) कार्यालयात याबाबत विचारणा केली असता फंड उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे.
सानुग्रह अनुदान (बोनस), प्रलंबित आहार व जोखीम भत्ता लवकरात लवकर द्यावा, त्याचबरोबर मासिक अहवाल सादर करण्याची जाचक अट रद्द करून पूर्वीप्रमाणे वार्षिक अहवाल सादर करण्याची परवानगी मिळावी, सेवाज्येष्ठ कर्मचारी आणि नवीन कर्मचारी यांच्या वेतनातील तफावत दूर करावी नाहीतर बेमुदत उपोषणाला बसू, असा इशारा म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी दिला आहे. संघटनेच्या मागण्यांचे निवेदन कदम यांनी आरोग्य समिती अध्यक्षा राजूल पटेल यांना दिले आहे.

























































